मृत झालेल्या सासऱ्यांच्या नावावर नऊ लाखांचा निधी आहे. तो मिळवून देण्याच्या आमिषाने शहरातील एका नामांकित गणेश मंडळाच्या अध्यक्षाच्या पत्नीला तब्बल १ कोटी ६८ लाख रुपयांचा गंडा अज्ञातांनी घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार विविध संस्थांचे प्रतिनिधी असल्याचे बतावणी करणारे आणि एका मोबाइलधारक महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेचे पती शहरातील एका नामांकित गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत. महिलेचे सासरे देखील या मंडळाचे अध्यक्ष होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यानंतर पाच वर्षांपूर्वी एका महिलेने तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला होता. ‘तुमच्या सासऱ्यांच्या नावावर नऊ लाखांचा निधी होता. ही रक्कम तुमच्या खात्यात जमा करायची आहे. त्यासाठी आयुर्विमा पॉलिसी काढावी लागेल तसेच काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल’, असे आमिष तक्रारदार महिलेला दाखवण्यात आले होते.

त्यानंतर पुन्हा महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधण्यात आला. नऊ लाखांऐवजी अठरा लाख रुपयांचा निधी असल्याची बतावणी पुन्हा करण्यात आली. महिलेला अज्ञातांनी फसवणुकीच्या जाळ्यात ओढले. गेल्या पाच वर्षांत महिलेकडून १ कोटी ६८ लाख ११ हजार ६१९ रुपये घेण्यात आले, तसेच सोन्याचे दागिने घेण्यात आले. महिलेला काही खासगी बँकांच्या शाखेच्या बाहेर बोलविण्यात आले होते. तेथे महिलेची काही कागदपत्रांवर स्वाक्षरी घेण्यात आली होती. एकूण मिळून ३४ जणांनी माझी फसवणूक केली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे.  पोलीस उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी तपास करत आहेत.

Story img Loader