लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: महिलेशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केल्या प्रकरणी लोणी काळभोर परिसरातील कोरेगाव मूळ ग्रामपंचायत सदस्याच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
या प्रकरणी सचिन गुलाबराव निकाळजे (रा. कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे ) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.आरोपी निकाळजे ग्रामपंचायत सदस्य आहे. निकाळजे महिलेला गेल्या काही महिन्यांपासून त्रास देत होता; तसेच तिचा पाठलाग करत होता. महिलेने प्रतिसाद न दिल्याने निकळजे तिच्यावर चिडला होता.
आणखी वाचा-पिंपरी- चिंचवड: गांजा विक्री करणाऱ्या आई आणि मुलाला बेड्या; करायचे किरकोळ विक्री
त्यानंतर निकाळजे महिलेच्या घरात शिरला. अश्लील वर्तन करुन तिला शिवीगाळ केली. या प्रकाराची कोणाला माहिती दिल्यास मुलांना जीवे मारु, अशी धमकी देऊन निकाळजे पसार झाला. घाबरलेल्या महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक धायगुडे तपास करत आहेत.