नारायणगाव : तीस वर्षीय महिलेच्या दोन प्रियकरांनी मिळून ओढणीच्या साहाय्याने तिचा गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारायणगाव पोलीस आणि पुणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेने २४ तासांतच हा गुन्हा उघड केला आहे. तंबाखू माव्याच्या पुडीवरून पोलीस आरोपींपर्यंत पोहोचले. या महिलेकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने आरोपींनी तिचा खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे.
शुभम मनोज गुळसकर (वय २२, रा. बोल्हेगाव, अहमदनगर) आणि मिथिलेश डोमी यादव (रा. एम.आय.डी.सी वडगाव कांदळी, ता.जुन्नर; मूळ रा. जि. सुपौल, बिहार) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खून झालेली महिला मूळची बिहार येथील आहे. सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव कांदळी येथे चवळीच्या शेतात एका अनोळखी महिलेचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला होता.
हेही वाचा – पुणे : वैमनस्यातून तरुणावर टोळक्याकडून कोयत्याने वार, लोहियानगर परिसरातील घटना
हेही वाचा – पुणे : जोशीमठ आणि पाचगणी यात भौगोलिक साधर्म्य? नैसर्गिक मर्यादांवर मानवी अतिक्रमण
पोलिसांनी घटनास्थळाची कसून पाहणी केली. त्या ठिकाणी त्यांना तंबाखू माव्याची एक पुडी मिळाली होती. त्याचप्रमाणे खून झालेल्या महिलेच्या अंगावरील ओढणीवर एक स्टीकरही सापडले होते. त्यावरून तपास करीत पोलीस शुभम गुळसकर याच्यापर्यंत पोहोचले. त्याच्या मदतीने मिथिलेश यादवचा ठावठिकाणा लागला. दोघांनी मिळून महिलेचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची कबुली आरोपींनी पोलिसांकडे दिली. पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पृथ्वीराज ताटे, उपनिरीक्षक धनवे, विनोद धुर्वे, जगदाळे, हवालदार दीपक साबळे, संदीप वारे, पोपट मोहरे, दिनेश साबळे, सचिन कोबल आदींच्या पथकाने ही कामगिरी केली.