लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मुलाच्या विवाहासाठी एका महिलेने कष्टाने दोन लाखांची रोकड जमाविली. सुनेसाठी दागिनेही घडवून घेतले. दिवसभर दुकानात थांबाावे लागत असल्याने महिला दररोज ऐवज पिशवीत घेऊन दुकानात यायची. दुकानात खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या एका महिलेने चार लाख ५७ हजार हजार रुपयांचा ऐवज असलेली पिशवी चोरून नेल्याची घटना वारजे भागात घडली. कष्टाने कमाविलेला ऐवज डोळ्यादेखत चोरीला गेल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

याबाबत एका ४० वर्षीय महिलेने वारजे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला वारजे भागातील सहयोगनगर भागात राहायला आहेत. त्यांचे वारजे माळवाडीतील अष्टविनायक चौकात त्यांचे भाजीपाला, मसाले विक्री, तसेच बांगड्याचे दुकान आहे. सकाळी साडेसात ते रात्री साडेदहा पर्यंत त्यांचे दुकान सुरू असते. त्यांच्या मुलाचा विवाह ठरला आहे. घरी दिवसभर कोणी नसल्याने महिला दररोज मुलाच्या विवाहासाठी जमा केलेली दोन लाखांची रोकड आणि दागिने पिशवीत घेऊन दुकानात यायची. मुलगा आईला दुकानात मदत करतो.

२२ मार्च रोजी महिला आणि मुलगा दुकानात नेहमीप्रमाणे आले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मुलगा मार्केट यार्डात मसाले खरेदीसाठी गेला. तेव्हा दुकानात गर्दी झाल्याने महिलेने शेजारी भाजी विक्री करणाऱ्या एका तरुणाला मदतीसाठी दुकानात बोलावले. सायंकाळी साडेसातच्या सुमारास एक महिला दुकानात बांगड्या खरेदीसाठी आली. दुकानाबाहेर महिलेचा साथीदार दुचाकीवर थांबला होता.

महिलेने बांगड्यांबाबत विचारणा केली. तेव्हा दुकानदार महिलेने तिला बांगड्या दाखविण्यास सुरुवात केली. तेव्हा या बांगड्या लहान आहे. माझ्या सासूसाठी मोठ्या बांगड्या हव्या आहेत, अशी बतावणी महिलेने दुकानदार महिलेकडे केली. तेव्हा दुकानदार महिलेने तिला सासूला घेऊन ये, असे सांगितले. बांगड्या पु्न्हा ठेवत असताना दुकानदार महिलेचे लक्ष नसल्याची संधी तिने साधली. दुकानातील एका जाळीवर ठेवलेली पिशवी घेऊन महिला दुकानातून घाईगडबडीत बाहेर पडली.

दुकानदार महिलेला संशय आल्याने तिने जाळीवर ठेवलेली पिशवी पाहिली. तेव्हा पिशवी जागेवर नसल्याचे लक्षात आहेल. महिलेने दुकानात बाहेर येऊन पाहिले. पिशवी घेऊन दुकानातून बाहेर पडलेली महिला तिच्या साथीदारासोबत दुचाकीवरुन पसार झाल्याचे उघडकीस आले. घाबरलेल्या महिलेने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उपनिरीक्षक संजय नरळे यांनी घटनास्थळी भेट दिली. दुकानातून ऐवज चोरून पसार झालेल्या महिलेचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस हवालदार अर्जुन पवार तपास करत आहेत.