पुणे : नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात गांजा विक्री करणाऱ्या महिलेला वर्षभरासाठी पुणे जिल्हा, तसेच शहरातून तडीपार करण्याचे आदेश परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले. छकुली राहुल सुकळे (वय २४ रा. वाघेश्वरनगर गायरान वस्ती,वाघोली, नगर रस्ता) असे तडीपार केलेल्या महिलेचे नाव आहे. छकुली सुकळेविरुद्ध अमली पदार्थ विक्री प्रकरणी वाघोली आणि लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बेकायदा गांजा बाळगणे, पोलिसांच्या ताब्यातून पसार होणे, चोरी करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे तिच्याविरुद्ध दाखल आहेत. सुकळेने परिसरात दहशत माजविण्याचे गुन्हे केल्याने तिच्याविरुद्ध कोणी तक्रार देत नव्हते. तिला पुणे, पिंपरी-चिंचवड  शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंडीत रेजीतवाड, उपनिरीक्षक वैजीनाथ केदार, सागर कडू, कमलेश शिंदे यांनी तयार केला होता. संबंधित प्रस्ताव सहायक पोलीस आयुक्त प्रांजली साेनवणे यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी मंजूरी दिली. त्यानुसार सुकळेला शहरातून वर्षभरासाठी तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.

पुणे शहर परिसरात गांजा विकणाऱ्या तस्करांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहे. अनेक महाविद्यालय तरुण गांजाचे व्यसन करत असल्याचे आढळून आल्यानंतर शहरात गांजा विक्री करणारे सराइत, तसेच तस्करांविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. मध्यंतरी लोणी काळभोर भागात शेतात अफू लागवड करण्याचा प्रकार उघडकीस पोलिसांना आणला होता. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली होती.