पुण्यातील चंदननगरमधील आनंद पार्क येथे एका महिलेची अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केली. एकता ब्रिजेश भाटी (वय ३८) असे या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी महिलेच्या पतीचीही चौकशी केली जाणार आहे. मात्र, सध्या ते बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत, असे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आनंदपार्कमध्ये राहणाऱ्या एकता भाटी या बुधवारी सकाळी घरीच होत्या. नऊच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घरात प्रवेश केला.  त्यांनी एकता यांच्यावर गोळी झाडली. यानंतर हल्लेखोर पसार झाले. गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या एकता यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोवर त्यांचा मृत्यू झाला होता. एकता यांचे पती ब्रिजेश भाटी यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. दरवाजा उघडा असल्याने हल्लेखोरांनी सहज घरात प्रवेश केल्याचे ब्रिजेश यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, दिवसा हल्लेखोर सोसायटीच्या आत घुसून घरापर्यंत पोहोचले आणि ही बाब कोणालाही कशी समजली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी आता सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रिजेश यांची देखील चौकशी केली जाईल, असे पोलीस दलातील सूत्रांनी सांगितले. आनंद पार्कमधील इंद्रायणी गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या एकता यांची खानावळ होती.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman shot dead in anand park police probe begin
Show comments