पुणे : त्रासामुळे महिलेने मद्यपी पतीचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता भागात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेतले. किरपा बिप्त (वय ४२, मूळ रा. नेपाळ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पत्नी हिरा बिप्त (वय ४६) हिला सिंहगड रस्ता पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले.

हेही वाचा >>> पुणे : वनराज आंदेकर खून प्रकरणात शस्त्रे पुरविणारा सराइत गजाआड

बिप्त मूळचे नेपाळमधील आहे. नऱ्हे भागातील मानाजीनगर परिसरात असलेल्या स्वप्नपूर्ती रेसीडन्सी सोसायटीत ते रखवालदार म्हणून काम करायचे. किरपाला दारू पिण्याचे व्यसन आहे. तो दारु पिऊन पत्नी हिराला त्रास द्यायचा. या कारणावरुन त्यांच्यात नेहमी वाद व्हायचे. रविवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाले. हिराने चाकूने पती किरपावर वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. पोलिसांनी या घटनेची माहिती मिळाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षीरसागर यांनी घटनास्थळी भेट दिली.

किरपाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. त्याची पत्नी हिराला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.