पुणे : कौटुंबिक वादातून एकाने पत्नीवर कात्रीने वार करुन खून केल्याची घटना बुधवारी पहाटे खराडी भागात घडली. याप्रकरणी चंदननगर पोलिसंनी पतीला अटक केली. ज्योती शिवदास गिते (वय २८, रा. गल्ली क्रमांक ५, तुळजाभवानी नगर, खराडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शिवदास तुकाराम गीते (वय ३७) याला अटक केली आहे. बुधवारी (२२ जानेवारी) पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आराेपी शिवदास गिते मूळचा बीडमधील आहे. तो न्यायालायात टंकलेखक आहे. तुळजाभवानीनगर भागात तो भाडेतत्त्वावर खोली घेऊन राहत होता. गेल्या काही दिवसांपासून गिते दाम्पत्यात कौटुंबिक कारणावरुन वाद व्हायचे. बुधवारी पहाटे ज्योती आणि तिचा पती शिवदास यांच्यात वाद झाले. त्यानंतर शिवदासने घरातील कात्रीने ज्योतीच्या गळ्यावर कात्रीने वार केले. शिवदासने केलेल्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली.
हेही वाचा >>>‘स्मार्ट कार्ड’विना ‘एसटी’ प्रवास अडचणीचा
आरडाओरडा ऐकून गाढ झोपेत असलेले शेजारी जागे झाले. शेजाऱ्यांनी चौकशी केली. तेव्हा ज्योती रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळून आले. या घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या ज्योतीला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. शिवदासला अटक करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.
© The Indian Express (P) Ltd