पुणे : मुंबई – कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेसमधील प्रवासी महिलेच्या अचानक छातीत दुखू लागले. तिला हृदयविकाराचा झटका आल्याने तिची प्रकृती खालावली. याची माहिती तिकीट तपासनीसाने तातडीने सातारा रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकाला दिली. त्यामुळे गाडी तिथे पोहोचण्याधीच रुग्णवाहिका तिथे दाखल झाली. तिथून या महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आल्याने तिचा जीव वाचू शकला.

महालक्ष्मी एक्स्प्रेस मुंबईहून कोल्हापूरला जात होती. गाडीच्या एस-१ डब्यात बसलेल्या महिलेच्या छातीत दुखू लागले. कोणाला काही समजण्याच्या आतच महिलेला हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी प्रवाशांनी तातडीने रेल्वेतील तिकीट तपासनीसाला याची माहिती कळविली. तिकीट तपासनीस आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने त्या डब्यात धाव घेतली. महिलेची गंभीर प्रकृती पाहून तिकीट तपासनीसाने सातारा रेल्वे स्थानकाच्या व्यवस्थापकास याबाबत माहिती कळवून उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या.

हेही वाचा…पुणेरी मेट्रोला गती! हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावर‘थर्ड रेल’ विद्युतीकरण कार्यान्वित होणार

महालक्ष्मी एक्स्प्रेस सातारा स्थानकात पोहोचली त्यावेळी तिथे रुग्णवाहिका येऊन थांबली होती. या प्रवासी महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात हलविण्यात आले. तिच्यावर वेळीच उपचार झाल्याने तिचा जीव वाचला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी महिलेसोबत असलेल्या नातेवाईकांना सर्वतोपरी मदत केली. रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे प्रवासी महिलेला जीवदान मिळाले.

हेही वाचा…महायुती : रामदास आठवलेंचा विधानसभेच्या आठ ते दहा जागांवर दावा; म्हणाले…

कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप

प्रवासी महिलेला तातडीने मदत करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांचे विभागीय रेल्वे व्यवस्थापिका इंदू दुबे आणि अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंग यांनी कौतुक केले आहे. याचबरोबर प्रवासी महिलेच्या नातेवाईकांनीही त्यांचे आभार मानले.