रेल्वेत विनातिकीट अथवा वैध तिकीट नसलेल्या प्रवाशांवर सातत्याने कारवाई केली जाते. पुणे विभागात महिला तिकीट तपासनीस मनीषा चाकणे यांनी मागील आर्थिक वर्षात तब्बल ९७ लाख ५५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. त्यांनी या कालावधीत रेल्वेला दिवसाला सरासरी ३३ हजार ६४१ रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे विभागात मनीषा चाकणे या सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणाऱ्या महिला तिकीट तपासनीस ठरल्या आहेत. त्यांच्यानंतर रुपाली माळवे यांनी ६१ लाख रुपये आणि रुपाली नाशिककर यांनी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले आहे. तिकीट तपासनीसांची कामगिरी सुधारावी यासाठी विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ.रामदास भिसे यांनी वेगळा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. यानुसार त्यांनी सर्व तिकीट तपानीसांशी संवाद साधून काय करता येईल, याबाबत त्यांची मते जाणून घेतली.

हेही वाचा >>> पुणे-बिकानेर एक्सप्रेसला केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचा हिरवा झेंडा

डॉ.भिसे यांनी त्यानंतर काही महिला तिकीट तपासणीसांना एकाच मार्गावर नियुक्ती देण्याऐवजी त्यांना कोणत्याही गाडीत जाऊन तिकीट तपासणी करण्यासाठी नेमणूक केली. त्यात चाकणे, माळवे आणि नाशिककर यांचा समावेश होता. आधी प्रामुख्याने उपनगरी गाड्यांमध्ये महिला तिकीट तपासनीसांची नियुक्ती होती. त्यांना कोणत्याही गाडीत जाऊन तपासणी करण्याचे अधिकार मिळाल्याने त्यांची कामगिरी सुधारली आणि पर्यायाने रेल्वेच्या उत्पन्नातही वाढ झाली.

पुणे विभागाची २४ कोटींची कमाई

पुणे विभागाचा विचार करता तिकीट तपासणीतून आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये १९ कोटी ४४ लाख ७१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये करोना संकटामुळे रेल्वे सेवा बंद असल्याने त्यात घट होऊन ते ७९ लाख २१ हजारांवर आले. त्यानंतर आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये त्यात पुन्हा वाढ होऊन ते १० कोटी ९७ लाख ७३ हजारांवर पोहोचले. मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये ते २४ कोटी ६५ लाख ७९ हजार रुपयांवर गेले.

कोयना एक्स्प्रेसमध्ये फक्त महिला तपासनीस

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेसमध्ये फक्त महिला तिकीट तपासनीस नेमण्याचा प्रयोग पुणे विभागाने केला. मुंबईवरून गाडी पुण्यात आल्यानंतर गाडीत दोन महिला तिकीट तपासनीस पुण्यातून रवाना होतात. याचवेळी कोल्हापूरमधून सुटणाऱ्या गाडीत पुण्यापर्यंत दोन महिला तिकीट तपासनीस असतात. या निमित्ताने महिला तिकीट तपासनीसांना वेगळी जबाबदारी देण्याचा प्रयत्न रेल्वेने केला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman tc manisha chakne from pune division collected fine of rs 97 lakh 55 thousand in last financial year pune print news stj 05 zws