ऑनलाइन टास्कच्या नावाने शिकवणी चालक महिलेची पाच लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या बाबत एका महिलेने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला सिंहगड रस्त्यावरील धायरी फाटा भागात राहायला आहेत. त्या शिकवणी चालक आहेत. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता.
हेही वाचा >>> सातारा रस्त्यावर धावत्या मोटारीला आग; मोटारचालकासह महिला त्वरीत बाहेर पडल्याने अनर्थ टळला
घरातून काम करण्याची संधी उपलब्ध असे आमिष चोरट्यांनी महिलेला दाखविले होते. सुरुवातीला चोरट्यांनी महिलेला समाजमाध्यमातील मजकूर, तसेच ध्वनिचित्रफितीस दर्शक पसंती मिळवून देण्याचे आमिष दाखवून तिला काही पैसे दिले. त्यानंतर महिलेला जाळ्यात ओढून चोरट्यांनी महिलेला बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. महिलेकडून चोरट्यांनी वेळाेवेळी पाच लाख रुपये उकळले. महिलेला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर अधिस तपास करत आहेत.