पुणे : देशाच्या संरक्षणासाठी समर्थ अधिकारी घडविणाऱ्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनीच्या (एनडीए ) ७५ वर्षांच्या इतिहासात दीक्षान्त संचलनात (मार्चिग) महिलांच्या बटालियनने गुरुवारी प्रथमच पदसंचलन केले. ही ऐतिहासिक घटना असल्याचे नमूद करत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महिलांच्या संचलनातील सहभागाची प्रशंसा केली.
देशसेवेचे स्वप्न घेऊन तीन वर्षांचे पूर्ण केलेले खडतर प्रशिक्षण, भविष्यातील आव्हानांना सक्षमपणे पेलण्याचा आत्मविश्वास बाळगत लष्करी बँड पथकाच्या ‘कदम कदम बढाये जा’ आणि ‘सारे जहाँ से अच्छा’ या गीतांच्या तालावर शिस्तबद्धरीत्या चालणारी पावले या वैशिष्टय़ांसह राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४५ व्या तुकडीचे दीक्षान्त संचलन गुरुवारी दिमाखात पार पडले. राष्ट्रपती मुर्मू यांनी मानवंदना स्वीकारली. राज्यपाल रमेश बैस, सरसेनाध्यक्ष (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल अनिल चौहान, लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह, प्रबोधिनीचे कमांडंट व्हाइस अॅडमिरल अजय कोचर, उपप्रमुख मेजर जनरल मनोज डोग्रा या वेळी उपस्थित होते.
छात्रांना संबोधित करताना राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या, की आजच्या काळातही महिलांना आवडीचे करिअर निवडण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशातच राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दीक्षान्त संचलनात महिलांचा सहभाग कौतुकास पात्र आहे. तरुणांसाठी तुम्ही एक ‘रोल मॉडेल’ आहात. ‘सेवा परमो धर्म’ हे ब्रीद कायम स्मरणात ठेवा.
हेही वाचा >>>आजी-माजी राष्ट्रपतींची पुण्यात अनोखी भेट
प्रथम सिंग हा राष्ट्रपती सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. जतिन कुमार रौप्यपदकाचा, तर हर्षवर्धन भोसले कांस्यपदकाचा मानकरी ठरला. ‘ज्युलियट स्क्वॉड्रन’ने ‘चीफ ऑफ स्टाफ बॅनर’ पटकाविला. त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
क्षणचित्रे : प्रबोधिनीतील तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर छात्रांनी पुढील प्रशिक्षणासाठी प्रबोधिनीतील ‘अंतिम’ पाऊल ओलांडताच जल्लोष केला.
चेतक हेलिकॉप्टर, जॅग्वार आणि सुखोई या लढाऊ विमानांनी दीक्षान्त संचलनाला दिलेली सलामी हे या सोहळय़ाचे विशेष आकर्षण ठरले.
देशाच्या संरक्षण दलांच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दीक्षान्त संचलनाची पाहणी केली.
प्रबोधिनीच्या अमृतमहोत्सवी वर्षांनिमित्त दीक्षांत संचलनानंतर छात्रांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमवेत छायाचित्र टिपण्यात आले.
‘स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद’
आई-बाबांचे स्वप्न पूर्ण केल्याचा आनंद वाटतो, अशी भावना राष्ट्रपतींचे कांस्यपदक पटकाविणाऱ्या हर्षवर्धन भोसले याने व्यक्त केली. हर्षवर्धन हा मूळचा कोल्हापूरचा आहे. त्याचे वडील बँकेत रोखपाल आहेत, तर आई गृहिणी आहे. ‘वडिलांचे काका एअर मार्शल अजित भोसले यांच्याकडून प्रेरणा घेऊन सैन्यदलात दाखल होण्याचे ठरविर्ले’, असे त्याने सांगितले.