पुणे : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नॅशनल टेस्टींग एजन्सीकडून (एनटीए) रविवारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) देशभरात घेण्यात आली. या परीक्षेवेळी सांगली येथील परीक्षा केंद्रांवर केलेल्या तपासणीवेळी मुलींशी गैरवर्तन झाल्याच्या प्रकाराची दखल घेऊन राज्य महिला आयोगाने एनटीए, तसेच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाला अहवाल सादर करण्याचा आदेश दिला.
हेही वाचा >>> भारत गौरव यात्रेत महाराष्ट्राला नगण्य स्थान; उत्तर, दक्षिण भारतातील धार्मिक, पर्यटन स्थळांवर भर
नीट परीक्षेवेळी परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची, विशेषतः मुलींच्या तपासणीवेळी गैरवर्तन झाल्याच्या घटना देशभरात घडल्याचे माध्यमांतून, समाजमाध्यमातून समोर आले आहे. या प्रकाराची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल घेण्यात आली. तसेच मुलींबरोबर अशा प्रकारच्या वागणुकीचा निषेध करण्यात आला. या प्रकाराची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पत्र एनटीएला देण्यात आले आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या, की एनटीएने देशभरात घेतलेल्या परीक्षेवेळी विद्यार्थिनींची अत्यंत चुकीच्या पद्धतीने तपासणी करण्यात आली.
हेही वाचा >>> ‘द केरळ स्टोरी’ राज्यात करमुक्त करावा; भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
कॉपीचे प्रकार रोखण्यासाठी ही दक्षता घेण्यात आली असली, तरी विद्यार्थ्यांचे खच्चीकरण होऊ नये अशा पद्धतीने तपासणी करणे गरजेचे होते. मात्र विद्यार्थिनींना कपडे उलटे करून घालायला लावणे, अंतर्वस्त्र तपासणे ही अत्यंत लज्जास्पद आणि निंदनीय बाब आहे. ज्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे तपासणी केली, त्याबाबत त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना होत्या का, त्या बाबत काही कागदोपत्री नोटिस होती का, अशा प्रकारे तपासणी करणे संबंधित विभागाला मान्य होते का हे प्रश्न आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाने तातडीने या प्रकरणाची चौकशी करावी. राज्यभरात असे आणखी काही प्रकार घडले आहेत का, याचीही चौकशी करून दोन दिवसांत त्याबाबतचा अहवाल राज्य महिला आयोगाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.