पुणे : खराडी भागात संगणक अभियंता तरुणीला अडवून चेहऱ्यावर ॲसिड टाकण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यानंतर तरुणीला भर रस्त्यात मारहाण केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आली. रोहित शरद माने (वय २७, रा. शास्त्रीनगर येरवडा) असे आरोपीचे नावा आहे. त्याच्या बरोबर असलेल्या साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणीने फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> विधान परिषद निवडणुकीत कोणाची विकेट पडणार? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान
तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार तक्रारदार तरुणी खराडी भागातील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला आहे. तरुणी आपल्या सहकाऱ्याबरोबर सायंकाळी सहाच्या सुमारास चहा प्यायला जात होती. याच वेळी आरोपी माने दुचाकीवरुन साथीदारांसोबत आला. त्याने तरुणीला त्रास देण्यास सुरुवात केली. तिने जाब विचारला तेव्हा माने आणि त्याच्यासोबत असलेल्या साथीदारांनी तरुणीला मारहाण केली.
हेही वाचा >>> मुसेवाला खून प्रकरणातील संशयित संतोष जाधवच्या साथीदारांकडून १३ पिस्तुले जप्त, खंडणी प्रकरणात टोळीतील सात जण अटकेत
मानेने तरुणीला चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्वरित तपास करुन मानेला ताब्यात घेतले. विनयभंग, धमकावणे, मारहाण केल्याप्रकरणी माने आणि त्याच्या बरोबर असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.