पुणे : सूक्ष्म, लघु आणि मध्यम (एमएसएमई) क्षेत्रात ‘व्हर्मेंट- ई-मार्केटप्लेस’ (जेम) माध्यमातून एक लाखांपेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे, तर दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (डिक्की) ५२ हजार दलित उद्योजकांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे ‘एमएसएमई’ हे महिला सक्षमीकरणाचे माध्यम म्हणून नावारुपाला येत असल्याचे ‘जेम’चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजित चव्हाण यांनी स्पष्ट करत महिला उद्योजकांनी देशाच्या प्रगतीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन केले.
जागतिक महिला दिनानिमित्त डिक्की संस्थेतर्फे आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. डिक्कीचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी कुमार नारा, संस्थापक अध्यक्ष डॉ. मिलिंद कांबळे, राष्ट्रीय समन्वयक मैत्रयी कांबळे ,महिला उद्योजिका गीता पेडणेकर, अविनाश जगताप, ललित बनसोड, संतोष कांबळे आदी उपस्थित होते. उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या करुणा शिवशरण, शीतल कांबळे, शीतल अल्हाट, मंगल मलंगे, सुजाता पगारे आदी यशस्वी महिला उद्योजकांना गौरविण्यात आले.
चव्हाण म्हणाले, ‘आज देशात असलेल्या युनिकॉर्नसमध्ये महिलांचा मोठा वाटा आहे. राज्यघटनेमुळे झालेल्या सामाजिक परिवर्तनामुळे महिला सर्व क्षेत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व करत आहे. संधींचे लोकशाहीकरण करण्यामध्ये ‘जेम’ची महत्वाची भूमिका आहे. अनुसूचित जाती व जमातीतील महिला उद्योजकांना उद्योजक होण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देते. त्यामुळे भविष्यात ‘स्वायत्त’ आणि ‘वूमणीय’ या उपक्रमांतर्गत अधिक महिला उद्योजक घडविण्यासाठी कार्यरत असणार आहे.’ तसेच भविष्यात देशभरातील दलित महिलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी डिक्कीचे सहकार्य असणार आहे. केंद्र-राज्य सरकार आणि डिक्की च्या सहकार्याने यशस्वी उद्योजक निर्माण करण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.