पिंपरी : टिंडर डेटिंग ॲपवरून झालेल्या ओळखीतून प्रेमसंबंध निर्माण झालेल्या अभियंता तरुणीवर अत्याचार, शिवीगाळ करत मारहाण करून तिचा डोळा फोडला. गळ्याला चाकू लावून तिच्या घरच्यांकडे पैशांची मागणी केली, पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिला घरात डांबून ठेवले. हा प्रकार २२ ऑक्टोबर २०२२ ते रविवार २ एप्रिल २०२३ पर्यंत लक्ष्मी चौक हिंजवडीत घडला.
याबाबत अभियंता तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तेजस किरण सौदणकर वय (२४, रा.बी ३०६, मंत्राईसेन्स सोसायटी उंड्री पिसोळी लिंक रोड, पुणे) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – पुण्यात ‘ईडी’कडून नऊ ठिकाणी छापे; व्यावसायिकांच्या निवासस्थानी, कार्यालयात कारवाई
पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी मूळची बिहारची असून २०१७ पासून पुण्यात राहत आहे. ती हिंजवडी आयटीमध्ये अभियंता आहे. आरोपी आणि फिर्यादी तरुणीची टिंडर डेटिंग ॲपवरून ऑक्टोबर २०२२ मध्ये ओळख झाली होती. दोघांची पहिल्यांदा मैत्री झाले. मैत्रीचे रुपांतर प्रेमसंबंधात झाले. तरुणी लग्नास होकार देत नसल्याने आरोपी तिला त्याच्या सदनिकेवर घेऊन अत्याचार करत होता.
हेही वाचा – पुणे : आठ वर्षांच्या मुलाला धमकावून दोन महिने अत्याचार; दत्तवाडी पोलिसांकडून तिघांना अटक
प्रियकर तेजस याचे आणखी एका दुसऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा फिर्यादीला जानेवारी महिन्यात संशय आला. त्यातून त्यांच्यात वाद निर्माण झाला. आरोपी तेजसने फिर्यादी अभियंता तरुणीला मारहाण केली. तिचा डोळा फोडला. तिच्या डोक्याला मारहाण झाली आहे. फिर्यादिला सतत मारहाण केली जात होती. शिवीगाळ करत तरुणीच्या गळ्याला चाकू लावला. तिच्या घरच्यांकडे पैशांची मागणी केली, पैसे दिले नाही तर जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्याच्या घरात तिला डांबून ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.