पुणे : शहरात महिलांकडील दागिने चोरून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. आळंदी रस्त्यावर दुचाकीवरील सहप्रवासी महिलेकडील चार लाखांचे दागिने असलेली पिशवी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. दागिने चोरणाऱ्या चोरट्याने धक्का दिल्याने दुचाकी घसरली. सुदैवाने या घटनेत दुचाकीस्वार पती आणि महिलेला गंभीर दुखापत झाली नाही.
याबाबत एका महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विश्रांतवाडीतील धानोरी भागात राहायला आहेत. महिलेच्या नात्यातील एकाचा विवाह समारंभ दिघी येथे होता. सोमवारी (१६ डिसेंबर) विवाह समारंभावरुन महिला आणि पती दुचाकीवरुन घरी निघाले. विवाह समारंभात परिधान केलेले चार लाख दहा हजारांचे दागिने महिलेने पिशवीत ठेवले होते. आळंदी रस्त्यावर बोपखेल फाट्याजवळ रात्री पावणेदहाच्या सुमारास दुचाकीस्वार चोरट्यांनी तक्रारदार महिलेकडील दागिने असलेली पिशवी चोरून नेली, अशी माहिती विश्रांतवाडी पाेलिसांनी दिली.
हेही वाचा – पुणे : शहरात दोन ठिकाणी आगीच्या घटना, वारजे भागातील आगीत अग्निशमन दलाचा जवान जखमी
हेही वाचा – …अन् ‘सारथी’ पुन्हा साथीला!
चोरट्यांनी धक्का दिल्याने दुचाकी घसरली. सुदैवाने या घटनेत महिला आणि तिच्या पतीला गंभीर दुखापत झाली नाही. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी आळंदी रस्त्यावरील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस उपनिरीक्षक पद्मराज गंपले तपास करत आहेत.