धुणी-भांडी करणाऱ्या, बांधकामाच्या ठिकाणी काम करणाऱ्या आणि शाळेचे तोंडही पाहण्याची संधी न मिळालेल्या महिला. त्यातील कित्येक जणींना अक्षरही लिहिता-वाचता येत नाही अशी परिस्थिती. खूप प्रयत्नांनंतर या महिला शिकायला तयार झाल्या, अक्षरे काढू लागल्या आणि नुकतीच २ मार्चला त्यांनी परीक्षाही दिली!
कोथरूडमधील सर्वागीण विकास संस्थेने हाती घेतलेल्या ‘महिला साक्षरता अभियाना’ची ही गोष्ट. गेले ८ महिने संस्थेतर्फे पाषाण येथील संजय गांधी वसाहतीत महिला साक्षरतेचे वर्ग चालवले जात आहेत. विशेष म्हणजे या उपक्रमात त्याच भागात राहणाऱ्या थोडय़ा-बहुत शिकलेल्या महिला आपल्या निरक्षर मैत्रिणींना अक्षरांचे धडे देत आहेत.
संस्थेचे संस्थापक आनंद कुलकर्णी यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘उपक्रम सुरू करताना आम्ही प्रथम वस्तीतील निरक्षर व्यक्तींचे सर्वेक्षण केले. त्या वेळी या भागात जवळपास ३५० निरक्षर लोक असल्याचे दिसून आले. त्यानंतर याच भागातील १० शिक्षित महिलांची निवड करून त्यांना २ दिवसांचे राज्य साधन केंद्राचे प्रशिक्षण देण्यात आले. यातील प्रत्येक शिक्षिकेने आपल्या गल्लीतील निरक्षर महिलांना निवडून त्यांना शिकवणीसाठी तयार केले. या निरक्षर महिला बांधकामावर काम करणाऱ्या किंवा धुणी-भांडय़ांचे काम करणाऱ्या असल्यामुळे त्यांना सोईची असलेली दुपारची किंवा संध्याकाळची वेळ निवडून रोज दोन तासांची शिकवणी देण्यास सुरूवात झाली. गेले ८ महिने या महिला शिकत असून नुकतीच राज्य साधन केंद्रातर्फे त्यांची परीक्षाही घेण्यात आली आहे.’’
उपक्रमात शिकणाऱ्या महिलांपैकी जवळपास ६० टक्के महिला पन्नाशीच्या आतल्या आहेत. त्यातील काही जणी २५ ते ३० या वयोगटातील असून साक्षर झाल्यामुळे त्यांच्यासाठी प्रगतीचे आणखी पर्याय खुले होणार असल्याचेही कुलकर्णी यांनी सांगितले.
पुढील दोन वर्षांत आणखी २०० महिलांना साक्षर करण्याचे संस्थेचे उद्दिष्ट असून या उपक्रमाला आर्थिक मदत करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ९४२२५१५७६० किंवा ९४२२५१५७६० या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेने केले आहे.
‘या वयात शिकून नोकरी भेटणार हाय व्हय?’
दहावी पास झालेल्या आणि शिकवण्याचा उत्साह असलेल्या सुनीता मंडलिक या उपक्रमात शिक्षिका बनल्या आहेत. आपण एमएससीआयटीचा अभ्यासक्रम पूर्ण केला असून आपल्यालाही पुढे शिकायचे आहे, असे त्या आवर्जून सांगतात. निरक्षर बायकांना अक्षरांचे धडे घेण्यासाठी राजी करणे चांगलेच आव्हानात्मक काम असल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘निरक्षर बायकांना शिकवणीला येण्यासाठी विचारल्यावर, ‘आता या वयात शिकून आम्हाला नोकरी मिळणार आहे का?,’ असाच त्यांचा सवाल असायचा. मग आम्ही त्यांना निरिनिराळी उदाहरणे देऊन राजी करायचो. आम्ही म्हणायचो, ‘शिकल्यामुळे तुम्हाला नोकरी मिळणार नाही, पण आयुष्यात तुम्हाला जे कधीच करायला मिळाले नाही ते करायला मिळणार आहे की! तुम्हाला शाळेत जायला मिळेल, बसस्टॉपवर उभे राहल्यावर आलेली बस कोणती ते इतरांना विचारावे लागणारे नाही, बँकेत गेल्यावर कागदावर लिहिलेले तुम्हालाच वाचता येईल, बालवाडीतल्या नातवाचा अभ्यासही घेता येईल.’ ’’
‘शिकायला आलेल्या बायकांना आम्ही पहिले ८ दिवस फक्त पाटीवर रेघा ओढून आकार काढायला शिकवले. मग थोडी-थोडी अक्षरे आणि शब्द शिकवले. तिशीतल्या मुली पटकन शिकायच्या. पन्नाशीच्या बायकांना शिकायला त्यांच्यापेक्षा जास्त वेळ लागत असल्यामुळे त्या सुरुवातीला थोडय़ा खट्टू व्हायच्या. पण नंतर या बायकाही चांगल्या शिकू लागल्या,’ असे मंडलिक यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा