आयटी हब असणाऱ्या हिंजवडीत तरुणीला झाऱ्याचे चटके देऊन बळजबरी करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी १८ वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी परिसरात पीडित तरुणी दोन मैत्रिणीसह राहते. ही तरुणी पुण्यातील एका महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेत आहे. मंगळवारी दुपारी मैत्रिणी कामावर गेल्यानंतर पीडित घरात एकटीच होती. तेव्हा, अनोळखी इसमाने (आरोपी) पाण्याचा जार घेण्याच्या नावाने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्याने किचनमध्ये या तरुणीला थेट मिठी मारण्याचा प्रयत्न केला.
तरुणी घाबरली तिने झटापटीत स्टीलचा झारा फेकून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. हे पाहून अनोळखी आरोपीने दुसऱ्या तरुणाला आत बोलावले. पैकी एकाने तरुणीच्या पायावर बसून तोंड, हात पाय दाबून धरले. दुसऱ्या आरोपीने तरुणीला सिगारेटचा चटका देण्याचा प्रयत्न केला असता तरुणीने हाताला झटका दिला. सिगारेट खाली पडली. तो आरोपी आणखीच चिडला अन त्याने गॅस वर झाऱ्या गरम करून तरुणीला डाव्या हाताला चटका दिला. त्यानंतर हे आरोपी घटनास्थळावरुन पळून गेल्याचं पोलिसांकडे दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
तरुणीने कपडे काढून घेण्याचा प्रयत्न करत तिचं चुंबन घेत तिचा विनयभंगही या आरोपांनी केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंखे ह करत आहेत.