लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा गळा दाबून खून केल्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलीस वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने पतीला रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर चौकशीसाठी बोलविलेल्या पतीने लघुशंकेचा बहाना करून स्वच्छतागृहात जात फरशी पुसण्याचे लिक्विड पिऊन चिखली पोलीस ठाण्यातच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
शरद रूपचंद चितळे (वय ३५, रा.रुपीनगर, तळवडे) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, त्यांनी पत्नीचा गळा दाबून खून केला आहे. त्यांना सहा वर्षांची एक मुलगी आहे.
पोलीस उपायुक्त शिवाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शरद हा पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेत होता. त्यातून त्यांनी १३ एप्रिल रोजी पत्नीचा गळा दाबून खून केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यानंतर शरद यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत. त्यांना रुग्णालयात दाखल केले. पत्नीला वायसीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. तर, शरद यांना निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
महिलेचा मृत्यू हा गळा दाबून झाल्याबाबत वैद्यकीय अधिकारी अभिप्राय व पोस्टमार्टम रिपोर्ट दिला. त्यांचे पती शरद यांना १८ एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. पत्नीच्या मृत्यूच्या अनुषंगाने चौकशीसाठी शरद यांना नातेवाईकांसह पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते.
चौकशी करीत असताना शरद यांनी लघुशंकेचा बहाना केला. ते पोलीस ठाण्याच्या स्वच्छतागृहात गेले. दरवाजा आतून कडी लावून बंद केला. पोलिसांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा तोडला असता शरद चितळे यांनी फरशी पुसण्याचे लिक्विड पिल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी नातेवाईकांच्या मदतीने शरद यांना वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत चिखली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.