अनंत चतुर्दशीच्या दिवशी घरातील गणपतीच्या विसर्जनाची तयारी, पहाटे उठून केलेली स्वयंपाकाची तयारी आणि नंतर सलग तीस-बत्तीस तासांचा बंदोबस्त.. पुण्यातील महिला पोलिसांचा दोन दिवसांचा क्रम असा होता. महिला पोलीस विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्ताला गुरुवारी (१५ सप्टेंबर) सकाळी हजर झाल्या. डीजेंच्या दणदणाटातच त्या गर्दीचे नियोजन करत होत्या, नागरिकांना वाट करुन देत होत्या आणि विसर्जन मार्गावर मंडळांना मार्गस्थ करण्यासाठीही प्रयत्न करत होत्या. तेहेतीस तासांच्या बंदोबस्तानंतरही त्या थकल्या नाहीत. बंदोबस्त आटोपेपर्यंत महिला पोलिसांचा उत्साह तसूभरही कमी झाला नव्हता..
विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तात महिला पोलिसांचा मोठा सहभाग असतो. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, टिळक रस्ता, केळकर रस्ता या प्रमुख विसर्जन मार्गावर महिला पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच शहराच्या वेगवेगळ्या भागात महिला पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. विसर्जन मिरवणुकीनिमित्त शहरात नऊ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामध्ये एक हजार महिला पोलीस होत्या. गुरुवारी (१५ सप्टेंबर) सकाळी आठच्या सुमारास बंदोबस्तावर हजर झालेल्या महिला पोलिसांनी विसर्जन मिरवणूक पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. बेलबाग चौकात उपस्थित राहून पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला संपूर्ण मिरवणूक सोहळ्यावर लक्ष ठेवून होत्या. फरासखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी मध्यरात्री गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्याबरोबर महिला पोलिसांचे पथक तेथे होते. शुक्रवारी (१६ सप्टेंबर) दुपारी तीनच्या सुमारास विसर्जन बंदोबस्ताची सांगता झाल्यानंतर महिला पोलीस घरी गेल्या. सलग तेहेतीस, चौतीस तासांच्या या बंदोबस्तानंतर मिरवणूक शांततेत पार पडली, हेच कामाचे फलित अशी त्यांची भावना होती.
विश्रामबाग पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अर्चना पेरणे आणि निशा पवार म्हणाल्या की, गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास बंदोबस्त सुरु झाला. बंदोबस्तावर येण्यापूर्वी घरातील सर्व कामे आटोपली. त्यानंतर बंदोबस्तासाठी आलो. विसर्जन मिरवणुकीचा सर्वाधिक ताण मध्यभागातील बंदोबस्तावर असतो. मिरवणुकीचा प्रारंभ झाल्यापासून काम सुरु झाले. मिरवणुकीत किरकोळ वाद वा अन्य घटना घडतात. मंडळांना विसर्जन मार्गावर आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर चकरा माराव्या लागतात. पावसातही बंदोबस्त कायम असतो. अशावेळी बुट भिजतात. पायही खूप दुखतात. विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडणे हे उद्दिष्ट असते. त्यामुळे क्षणभरही आराम मिळत नाही. मिरवणूक शांततेत पार पडली, हेच आमच्या बंदोबस्ताचे फलित आहे.
गुन्हे शाखेतील महिला पोलीस दमयंती जगदाळे म्हणाल्या, की बंदोबस्त सुरु झाल्यानंतर थोडीशीही उसंत मिळत नाही. ढोल ताशा आणि डिजेंच्या दणदणाटामुळे कान अक्षरश: बधिर होतात. विसर्जन मार्गावर किरकोळ कुरबुरी होतात. सलग बंदोबस्तानंतर थकवा येतो. बंदोबस्ताची सांगता झाल्यानंतर पुन्हा घरची कामेही करायची असतात. थोडा आराम केल्यानंतर लगेचच घरी गेल्यावर स्वयंपाकाची तयारी करावी लागते. तरीही दिलेले सर्व काम व्यवस्थित झाले याचा आनंद असतोच.