लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात घडली. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी पतीला अटक केली.
रेश्मा भिकू खुडे (वय ३२, सध्या रा. कुटे मळा, मानाजीनगर, नऱ्हे, मूळ रा. वडूज, जि. सातारा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी कुमार कलगोंडा पाटील (वय ४२, मूळ रा. इचलकरंजी, कोल्हापूर) याला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेश्मा यांचा पहिला विवाह झाला होता. पतीसोबत पटत नसल्याने त्यांनी आरोपी कुमारशी दुसरा विवाह केला. पहिल्या पतीपासून त्यांना दोन मुले होते. महिनाभरापूर्वी त्या कुमार याच्यासोबत नऱ्हे भागात राहायला आल्या होत्या. कुमार रेश्मा यांच्या चारित्र्याचा संशय घेत होता. या कारणावरुन त्यांच्यात वाद झाले होते.
आणखी वाचा-पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू
शुक्रवारी सायंकाळी कुमार कामावरुन घरी आला. त्याने पुन्हा रेश्मा यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. वादातून त्याने रेश्मा यांचा ओढणीाने गळा आवळून खून केला. या घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपी पती कुमारला अटक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सागर पवार तपास करत आहेत.