सरकारच्या लाडकी बहीण योजनेबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे त्या महिलांना मिळाला नसल्याचा दुजोरा दिला आहे. अजित पवार हे आज पिंपरी- चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या समारोप कार्यक्रमात बोलत होते. तेव्हा, त्यांनी हे विधान केलं आहे. अजित पवारांच्या आधी द्राक्ष बागायतदार यांनी त्यांच्या भाषणात लाडकी बहीण योजनेचा फायदा आमच्या महिलांनी घेतल्याचे सांगत लाडका शेतकरी योजना आणण्याचे आवाहन केलं. हाच धागा पकडून अजित पवारांनी, जर अशाच प्रकारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असेल तर काय बोलावं? असं म्हणत जनसन्मान यात्रेतील एक उदाहरण दिलं.
हेही वाचा – अन्नधान्य व्यापाऱ्यांचा उद्या लाक्षणिक बंद, राज्यभरातील घाऊक आणि किरकोळ बाजारपेठा बंद
पिंपरी- चिंचवडमध्ये महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायत संघाचा सांगता समारंभ पार पडला. या वेळी बोलताना, ही योजना लोकप्रिय झाल्याचे इथे एकाने सांगितले आणि आमच्याही द्राक्ष बागायतदार महिलांना पैसे मिळाल्याचे त्यांनी सांगितले. असे असेल तर न बोललेले बरे, असे अजित पवार म्हणाले. त्यावेळी हशा पिकला. त्यानंतरही बोलताना अजित पवार यांनी मी एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा, त्या भागात खूप चांगला ऊस असल्याचे पाहिले. तिथं मला महिलांनी दोन हात भरून राख्या बांधल्या. मी त्यांना विचारले पैसे मिळाले का? तर त्यांनी हो सांगितले आणि मी परत त्यांना विचारले ऊस किती गेला तर त्यांनी सांगितले ५०० ते ६०० टन. दादांनी हे सांगताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर त्यांनी सांगितले, ही लाडकी बहीण योजना ही कष्टकरी आणि गरीब परिस्थिती असलेल्या महिलांसाठी आहे. ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे. त्यांना ही योजना लागू होते.