— सागर कासार
विविध कार्यक्रमांच्या माध्यमांतून देशभरात आज जागतिक महिला दिन साजरा केला जात आहे. आजच्या दिवशी अविस्मरणीय आणि प्रेरणादायी काम करणाऱ्या महिलांची आवर्जुन आठवण काढली जाते, त्यांना गौरविण्यात येते. आजच्या या महिलादिनानिमित्त अशाच एका प्रेरणादायी व्यक्तीमत्वाच्या संघर्षाची कहाणी आम्ही तुमच्यासमोर आणली आहे. आपल्या सर्वसामान्य समाजाने कायमच दूर ठेवलेल्या ट्रान्सजेंडर समाजातील ही व्यक्ती असून अनेक अडचणींचा सामना करीत या व्यक्तीने आयटी क्षेत्रात आपले बस्तान बसवले. या ठिकाणी आधुनिक जगाशी जुळवून घेत प्रतिष्ठेचं जीवन ती आज जगत आहे. हृषिका शर्मा असे या प्रेरणादायी व्यक्तीचे नाव असून तिच्या संघर्षमय जीवनाचा घेतलेला हा वेध.
कोणत्याही ट्रान्सजेंडर व्यक्तीच्या जीवनात जसा धक्कादायक बदल होत जातो तसाच बदल हृषिकाच्या जीवनातही झाला. ती सांगते की, लहानाची मोठी होत असताना आपण कोणीतरी वेगळे आहेत याची जाणीव मला झाली. ही बाब कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांना धक्काच बसला, गावातील लोकांनाही ही बाब समजल्यानंतर त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कायमच वाईट राहिला. आपल्या सर्वसामान्य समाजातील या कटू अनुभवामुळे शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी गाव सोडण्याचा निर्णय घेतला आणि एखाद्या क्षेत्रात यशस्वी झाल्यावरच पुन्हा गावी परतण्याचा निर्धारही केला.
ऑक्टोबर २०१३ मध्ये पुणे स्टेशनवर पाऊल ठेवल्यानंतर इथे राहणार्या एका मित्राला मी पुण्यात आल्याची माहिती दिली. मात्र, त्याच्या घरी राहणे शक्य नसल्याने त्याच्या घरी माझी कपड्यांची बॅग ठेवत मी पुन्हा पुणे स्टेशनवर आले. आता पुढे काय करायचे असा विचार सतत मनामध्ये घोळत होता. घरून निघताना जवळ केवळ पंधराशे रुपये होते. दरम्यान, भूक लागल्याने एक वडापाव आणि चहा घेतला. तो खात असताना मोबाईलवर काही कंपन्यांच्या वेबसाईट चाळल्या आणि त्यांच्या ई-मेलवर नोकरीचे अर्ज पाठवले.
माझे सुदैव म्हणून त्याच दिवशी काही तासांनी एका आयटी कंपनीतून जॉबसाठी फोन आला. त्यामुळे मी आनंदीत झाले होते. त्यानंतर मी थेट कंपनीचे ऑफिस गाठले, रितसर मुलाखत पार पडल्यानंतर माझी निवड झाल्याचे सांगताना त्यांनी मला कामावर कधी रुजू होता अशी विचारणा केली. चांगला जॉब मिळाल्याचा आनंद झाला होता पण हा संघर्ष लगेच संपणारा नव्हता. कारण, रहायचं कुठं हा प्रश्न माझ्यासमोर होताच. त्यामुळे पुढील १५ दिवस मी रेल्वे स्टेशनवरच काढले. या काळात माझ्या मित्राने मला खूपच मदत केली. इथे कामाच्या वेळेअगोदर मित्र मला कपडे आणून द्यायचा. त्यानंतर मी कामावर जात असे. या पंधरा दिवसांच्या काळात खाण्याचे खूपच हाल झाले, वडापाव खाऊन दिवस काढले. एकेदिवशी रेल्वे स्टेशनवर असताना आमच्या ट्रान्सजेंडर समाजातील काही व्यक्तींनी मला ओळखले. त्यांनी मला धीर दिला त्यानंतर त्यांनी मला त्यांच्यामध्ये सामावून घेतले आणि मी त्यांच्यासोबत राहू लागले. पुण्यात येऊन आता जवळपास सहा वर्षांचा काळ लोटला असून गावापासून पुण्यात आल्यानंतर आजपर्यंतच्या प्रवासात अनेक बरे-वाईट अनुभव आले ते मी कधी विसरू शकणार नाही. मात्र, या कठीण काळातही टिकून राहण्याची जिद्द आणि आलेल्या विविध अनुभवामुळेच मी आज यशस्वी होऊ शकले अशी भावना तिने व्यक्त केली आहे.
२०१३मध्ये गाव सोडून पुण्यात आल्यानंतर आजपर्यंत अनेक आयटी कंपन्यांमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली. या प्रत्येक ठिकाणी मी स्वतः सिद्ध केले. आता एका आयटी कंपनीमध्ये काम करीत असताना मी ब्युटिशियन, मॉडेलिंग क्षेत्रातही काम करीत आहे. या कामातूनही मला आधिक समाधान मिळत आहे. सर्वसामान्य समाजातील माझ्याबाबतच्या कटू अनुभवामुळे आता यापुढे मला आमच्या ट्रान्सजेंडर समाजासाठी अधिक काम करायचे असून त्यांच्या हक्कांसाठी लढायचे आहे, असे हृषिका सांगते.
समाजातील प्रत्येक व्यक्तीचा आमच्याकडे पाहण्याचा एकच दृष्टिकोन आहे तो बदलण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी मी विशेष काम करणार आहे. आमच्या समाजातील अनेक उच्चशिक्षित व्यक्ती आहेत. त्यांना स्थिरता लाभावी तसेच सर्वमामान्यांमध्ये मिसळून काम करता यावे यासाठी शासनाने त्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले पाहीजे. यामुळे चांगला संदेश समाजापुढे जाईल तसेच आमच्याकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोनही बदलेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आज जगभरात महिला दिन साजरा केला जात असताना आम्ही देखील आमच्या पद्धतीने हा दिवस साजरा करणार आहोत असी भावनाही यावेळी तिने व्यक्त केली आहे.