महिलांची सुख-दुःख केवळ महिलाच समजू शकतात असं म्हटलं जातं, ते खरंही आहे. कारण असंच एक उदाहरण पुण्यात पहायला मिळालं आहे. समाजासाठी भोगवस्तू ठरलेल्या महिलांच्या अर्थात देवदासींच्या अडीअडचणींच्या काळात सदैव त्यांच्यासोबत राहणाऱ्या अलका गुजनाळ या बाई माणसाची ही प्रेरणादायी कहाणी आहे. आजच्या जागतिक महिला दिनानिमित्त त्यांची आठवण येणं अपेक्षित आहे.

पुणे महानगरपालिकेच्या समुह संघटिका म्हणून काम करणार्‍या अलका गुजनाळ यांच्याशी देवदासी महिलांसाठी आणि त्यांच्या मुलासाठी काम करण्याच्या अनुभवाबाबत संवाद साधला असता त्या म्हणाल्या, पुणे महानगरपालिकेमध्ये गेल्या १८ वर्षांपासून अनेक भागात समुह संघटिका म्हणून मी काम करीत आहे. माझे एमएसडब्ल्यूचे शिक्षण झाले असल्याने सामाजिक कार्याची आवड आहेच. त्या निमित्ताने मी शहरातील अनेक उपक्रमात नेहमी सहभाग घेत असते. माझं बालपण बुधवार पेठ भागात गेले असून या परिसराची मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यामुळे या ठिकाणी असणार्‍या देवीदासींना भेडसावणाऱ्या समस्यांबाबत मला जाणीव असून त्या सोडवण्याच्या दृष्टीने मी प्रयत्न करीत असते.

इथल्या महिलांच्या प्रामुख्याने आरोग्याच्या समस्या आधिक प्रमाणात आहेत. यातील कोणा महिलेला जर एचआयव्हीसारखा आजार जडला तर तो रोखण्यासाठी कशा प्रकारे उपचार घ्यायचे याची नीटसी माहिती त्यांना नसते. त्यांना याचे मार्गदर्शन मी करते तसेच त्याविषयी सतत त्यांच्यावर लक्ष दिले जाते. मात्र, हा आजार पूर्णतः बरा करण्याचे औषधच उपलब्ध नसल्याने अनेक महिलांचा यात मृत्यू होतो. जिवंत असताना त्यांच्या देहाची जशी हेळसांड होत असते तशीच त्यांच्या मृत्यूनंतरही होते. त्यांच्या मृतदेहाकडे कोणी लक्ष देत नाही. अंत्यसंस्कार कोणी करायचे असा प्रश्न निर्माण होतो. तेव्हा पोलीस प्रशासनासोबत चर्चा करून त्यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती म्हणून मी आजवर असंख्य देवदासी महिलांवर अंत्यसंस्कार केले, असे अलकाताई भावूक होऊन सांगतात.

अलकाताई यांचा या भागात काम करण्याचा प्रवास इथेच संपत नाही. देवीदासींच्या लहान मुलांसाठी या भागात अनेक संस्था काम करीत आहेत. त्यांपैकी ‘आशा ट्रस्ट’ या संस्थेसाठीही त्या काम करतात. या संस्थेत सद्यस्थितीला २५ मुले शिक्षण घेत आहेत. या संस्थेत सायंकाळी साडेसहा ते रात्री आठ वाजेपर्यंत संस्कार वर्ग भरवले जातात, त्यांना प्रेमाने खाऊ दिला जातो. इथेक अनेक चांगल्या गोष्टींची त्यांना माहिती दिली जाते. त्यांच्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेतली जाते, असे त्यांनी सांगितले. अशा प्रकारे समाजाने दूर सारलेल्या या घटकाला आपल्यात सामावून घेऊन त्यांना आधार देण्याचे आवाहनही त्या समाजाला करतात.

Story img Loader