लोकसत्ता वार्ताहर
बारामती : येथील ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती संचलित कृषी विज्ञान केंद्र आणि शारदा महिला संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने मागील १७ वर्षे सत्यत्यानी जागतिक महिला दिन साजरा केला जातो, या दिवसाचे अवचीत्य साधून यावर्षीही बारामती शारदाबाई पवार शैक्षणिक संकुलामध्ये सामाजिक क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या महिलांचा आत्मविश्वास वाढवा, त्यांच्या कार्यास प्रेरणा मिळावी, त्यांच्या कार्याचा गौरव तथा सन्मान व्हावा या हेतूने संस्थेच्या वतीने गुरुवारी ( दिनांक ६ मार्च २०२५ ) रोजी सकाळी १० वाजता शारदानगर येथील डॉ.आप्पासाहेब पवार सभागृहात हा शारदा सन्मान सोहळा पार पडला.
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात असामान्य कार्य करणाऱ्या ग्रामीण आणि शहरी महिलांचा संस्थेच्या वतीने शारदा सन्मान पत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात ढोल पथकाच्या गजरामध्ये मान्यवर व सत्कारमूर्ती महिला यांच्या आगमनाने झाली. यानंतर संस्थेच्या विश्वस्त सौ. सुनंदाताई पवार व सत्कारमूर्ती महिला यांनी दीप प्रज्वलन केले व सत्कारमूर्ती महिलांच्या स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
कार्यक्रमाच्या प्रस्ताविके मध्ये संस्थेच्या विश्वस्त सौ.सुनंदाताई पवार यांनी सभागृहातील महिला या माहेरपणासाठी आलेल्या आहेत त्यामुळे शारदानगरमध्ये दिवाळी साजरी करत आहोत असे वाटत असल्याचे म्हटले. देशामध्ये व महाराष्ट्रमध्ये बेरोजगारीचे व महिला अत्याचाराचे प्रमाण वाढते आहे.महिलांमध्ये खूप मोठी ताकद आहे,त्या एका वेळी दहा गोष्टी करू शकतात. स्त्रियांनी स्वतःला सन्मानित करणे गरजेचे आहे. स्त्रियांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढते आहे त्यामुळे स्त्रियांनी शारीरिक आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे,वेळेवर आरोग्य तपासणी गरजेचे आहे. कुटुंबामध्ये पालकांचे अनुकरण मुलं करतात त्यामुळे पालकांनी मुलांना चांगले आणि वाईट याची जाणीव करून दिली पाहिजे, त्याचबरोबर तुमच्या आर्थिक परिस्थितीची जाणीव मुलांना करून दिली पाहिजे, महिलांनी सक्षम होण्याकरता वाचन केलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मुक्तपणे काम केले पाहिजे असे मत व्यक्त केले.
या नंतर शारदा सन्मानपत्राचे वाचन संध्या सातपुते यांनी केले.यानंतर सत्कारमूर्तींचा परिचय पीपीटी सादरीकरणाच्या माध्यमातून केला,या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती म्हणून इंदुमती कुटे ,मलम्मा गोडसे –सोलापूर, नंदिनी जोशी पित्रे डोंबिवली ,प्रभादेवी घोघरे- अहमदनगर,अनुराधा भोसले- कोल्हापूर ,स्वाती पाध्ये अमरावती,मनसुख शेख कर्जत,लता मासाळ राशीन,ममताबाई भांगरे अहमदनगर ,कमल मोटे कर्जत,फातिमा चक्कीवाला पुणे लहूबाई वाघमारे कात्रज, सुरेखा सदाफुले जामखेड ,वंदना खेतमाळीस मिरजगाव ,रश्मी गंभीर जामखेड संगीता पिंगळे नाशिक ,सविता पांडे अहमदनगर ,रोहिणी पवार पुणे ,राणी नागरगोजे जामखेड,सोनाली पालव मुंबई, जयश्री मोरे बारामती,दीक्षा दिंडे पुणे ,अश्विनी कोल्हे जामखेड ,आरती गांगर्डे कोपरगाव, रेणुका काले कोपरगाव ,वृषाली गुजर पुणे, सिद्धी गावडे सावंतवाडी,गौरी शेळके अरणगाव ,लता कोकणे माळशिरस ,मंगल धुमाळ शारदानगर ,सरल बोराटे जामखेड वृषाली गुजर पुणे या उपस्थित होत्या.
या सर्व सत्कारमूर्तींचे औक्षण गुणवंत विद्यार्थिनींनी केले. तसेच त्यांना माहेरचा आहेर साडी- चोळी,सन्मानपत्र व संस्थेचे प्रतीक रोप देऊन त्यांचा सत्कार या संस्थेच्या विश्वस्त ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या सौ. सुनंदा ताई पवार त्यांच्या हस्ते झाला.या कार्यक्रमास बारामती,इंदापूर,दौंड, सोलापूर,अमरावती,नाशिक,जामखेड,कर्जत,पुणे,मुंबई इत्यादी ठिकाणाहून २००० महिला सहभागी झाल्या होत्या.
यानंतर भीमथडीमध्ये उत्तम काम केलेल्या नऊ महिला बचत गटांचा सत्कार करण्यात आला. शारदा महिला संघ कर्ज वाटप आढावा श्री.नागरे सर यांनी मांडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या सातपुते व अश्विनी दीक्षित यांनी केले. व कार्यक्रमाचे आभार गार्गी दत्ता यांनी केले.