शहरात विविध संस्था आणि संघटनांतर्फे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
‘स्त्री आधार केंद्रा’तर्फे महिला दिन आणि संस्थेच्या अठ्ठाविसाव्या वर्धापनदिनाचे औचित्त्य साधून संकटग्रस्त महिला व मुलींच्या मदतीसाठी ‘त्वरिता भरारी पथका’ची स्थापना करण्यात आली. मुलींना फसवून पळवून आणण्याचे प्रकार थांबावेत यासाठी हे पथक काम करणार आहे.
‘फुले-शाहू-आंबेडकर विचारमंचा’तर्फे काबाडकष्ट करून आपल्या अपत्यांना शिकविणाऱ्या महिलांचा डॉ. एस. टी. गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवंता सकट, चिन्नम्मा तुपधर, सुनंदा कांबळे, वैजयंता बनसोड या कष्टकरी महिलांना गौरविण्यात आले. हलाखीच्या परिस्थितीतही सकट यांचा मुलगा डॉक्टर, तुपधर यांची मुलगी सनदी अधिकारी, कांबळे यांचा मुलगा इंजिनियर तर बनसोडे यांचा मुलगा पोलीस अधिकारी झाला आहे.     
पोलीस आयुक्तालयातर्फे स्त्रियांवरील अत्याचारांबाबत जनजागृतीसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अपर पोलिस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, पोलिस उपायुक्त मकरंद रानडे, आमदार माधुरी मिसाळ, दीप्ती चवधरी, डॉ. नीलम गोऱ्हे, अॅड. निलीमा वर्तक, शिरीष कुलकर्णी, अॅड. रमा सरोदे आदिंनी या वेळी आपली मते मांडली.
पुणे विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र विभागातर्फे महिलांचे आरोग्य आणि आहार याबद्दल चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. फिटनेस सल्लागार आमिर खान, डॉ. शोभा राव, डॉ. वैशाली आगटे, डॉ. एच. सालवा, डॉ. निलीमा राजूरकर, डॉ. शैलेश कंटक आदिंची या वेळी व्याख्याने झाली.
दिवसभर नोकरी करून रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या पूना नाईट हायस्कूल आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या कनिष्ठ महाविद्यालयातील  विद्यार्थिनींचा शाळेतर्फे भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. अहिल्यादेवी प्रशालेत विविध क्षेत्रांत यश मिळविणाऱ्या विद्यार्थिनींच्या मुलाखती घेण्यात आल्या. तर ‘संवाद’ या संस्थेतर्फे महिला दिनाच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ क्रिकेटपटू चंदू बोर्डे यांच्याहस्ते पंधरा युवा महिला खेळाडूंचे सत्कार करण्यात आले. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे ज्येष्ठ भारूड सादरकर्त्यां पद्मजा कुलकर्णी यांचा सत्कार करण्यात आला. ‘संस्कृती डेव्हलपर्स’ आणि ‘सॅफ्रॉन डेव्हलपर्स’तर्फे  कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना गौरविण्यात आले. रोटरी क्लबच्या (लक्ष्मी रस्ता) वतीने दीपा भागवत, सुनीता शिरगुणी, रश्मी गद्रे, अर्चना मुंदडा, चेतना गुजर, डॉ. सुधा जठार, प्रतिभा पालनवार आदिंचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Womens day celebrated in enthusiastically in pune
Show comments