पुणे : शहरातील विविध सामाजिक संस्था, संघटनांकडून शनिवारी महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र रावळ समाज ट्रस्टतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त संगीत खुर्ची, मेणबत्ती लावणे, योगासन प्रात्याक्षिके आदी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष भांदुर्गे, कार्याध्यक्षा उषा गडदे, उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण, खजिनदार मुकेश रावळ यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. प्रियदर्शनी शिक्षण संस्थेतर्फे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मृणालिनी वाणी, नगरसेविका वर्षा साठे, संस्थेच्या अध्यक्षा शशिकला कुंभार, उपाध्यक्षा वर्षाराणी कुंभार आदी उपस्थित होेत्या. कृष्णाई ज्ञान प्रतिष्ठानतर्फे तीन दिवसीय व्यसनमुक्ती अभियानाची सुरुवात करण्यात आली. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुवर्णा भरेकर यांनी ही माहिती दिली. या वेळी किरण गोसावी, नंदा तुपे, विद्या भागवत, रत्ना जगताप, मीना गोसावी, रेवती हंबीर यांच्यासह संस्थेच्या अन्य सभासद उपस्थित होत्या.

शुभश्री शिक्षण संस्थेतर्फे महिला पोलिसांना मृणालिनी मदन वाणी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी मार्गदर्शन केले. ॲड. चित्रा चव्हाण, वर्षा साठे, रूपाली बिबवे, फिरोजा शेख आदी उपस्थित होत्या. अन्नपूर्णा परिवारातर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संवाद या त्रैमासिकाचे प्रकाशन करण्यात आले. अन्नपूर्णाच्या संस्थापक-अध्यक्षा डॉ. मेधा पुरव- सामंत, वर्षाली मगदूम आदी उपस्थित होेत्या. श्री बालाजी विद्यापीठातर्फे कथक गुरू शमा भाटे यांच्या हस्ते डॉ. सुरुची पांडे, प्रियंवदा पवार व टेनिसपटू ऋतुजा भोसले यांना ‘ग्रेस अँड पॉवर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी इंटरनॅशनल चेंबर ऑफ मेडिकल टुरिझमच्या संचालिका डॉ. प्रचिती पुंडे, आर्मीच्या आर्टिलरी विभागातील मेजर मॉलश्री अगरवाल, कुलगुरू डॉ. गंगाधर शिरुडे, कुलसचिव डॉ. एस. बी. आगसे आदी उपस्थित होते.

विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्ट आणि हिंद शक्ती फाउंडेशनतर्फे ज्येष्ठ कथक नृत्यांगना पं. मनीषा साठे यांच्या हस्ते कर्तृत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला. या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, समर्थ युवा फाउंडेशनच्या संचालिका सरोज राजेश पांडे, सहायक पोस्टमास्तर कैलास मोरे आदी उपस्थित होते. लायन्स क्लब पुणे सिटी आणि राष्ट्रीय कला अकादमीतर्फे श्री लकडी पूल विठ्ठल मंदिरात आयोजित कार्यक्रमात पासोड्या विठोबा मंदिराचे प्रमुख विश्वस्त रवींद्र फटाले यांच्या हस्ते कर्तृत्ववान महिलांना गौरविण्यात आले. या वेळी अध्यक्ष दिलीप बांदल, कोषाध्यक्ष दीपक थोरात, राष्ट्रीय कला अकादमीच्या संचालिका रोमा लांडे आदी उपस्थित होते.

शिरुर येथील ग्रामीण रुग्णालयातर्फे जीवन विकास मंदिर शाळेत ‘माझी आई, माझ्या शाळेत’ या उपक्रमांतर्गत महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ. सोनाली हार्दे, प्रियंका जावळे यांनी महिलांना आरोेग्यावर मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र धनक, मुख्याध्यापक गंगाधर तोडमल यांच्यासह पदाधिकारी, महिला उपस्थित होत्या. आयईईई पुणे विभागातर्फे केक कापून आनंद साजरा करण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिसर्च पार्क फाउंडेशन येथे आयोजित कार्यक्रमात जपान येथील डॉ. टकाको हशिमोटो, होप फाउंडेशनचे डॉ. आदित्य अभ्यंकर, आयईईई पुणेचे कार्याध्यक्ष अमर बुचडे, डॉ. सिमरन खियानी, विद्यापीठाच्या कुलसचिव डॉ. ज्योती भाकरे, अभिजित खुरपे, डॉ.राजश्री जैन आदी उपस्थित होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा आणि साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थिनींनी थोर महिलांची वेशभूषा करून आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला. या वेळी मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अनन्या बिबवे, लेखक-दिग्दर्शक पीयूष शाह, व्हाॅईस ओव्हर कलाकार सुवर्णा बोडस, शाळा समिती अध्यक्ष राजेंद्र जोग, मुख्याध्यापिका कल्पना वाघ, मीनल कचरे आदी उपस्थित होते. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनतर्फे अकरा नवोदित महिला वकिलांना धर्मादाय सहआयुक्त रजनी क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच धर्मादाय आयुक्तालयातील महिला कर्मचारी साधना जाधव यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सहायक धर्मादाय आयुक्त प्रशांत चव्हाण, माईंड ट्रेनर संभाजी पिसाळ, पीटीपीएचे अध्यक्ष ॲड. मोहन फडणीस आदी उपस्थित होते.

भावे हायस्कूल येथे विविध क्षेत्रांतील दहा कर्तृत्वावान महिलांचा सत्कार करण्यात आला. एस.सी.ई.आर.टी.च्या सहसंचालक अनुराधा ओक, लेखिका मेघना गोखले, दिलीप शेठ, देवानंद बागुल, अनिल मस्के, मुख्याध्यापक वसावे सायासिंग आदी उपस्थित होते.

उजास आणि पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टतर्फे मासिक पाळीचे आरोग्य आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करणाऱ्या वॉल पेंटिंग उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात १६ ते २५ वयोगटातील सुमारे एक हजार तरुणींना मासिक पाळी आरोग्याविषयी माहिती देण्यात आली. उजासच्या संस्थापक अद्वैतेश बिर्ला, प्रमुख पूनम पाटकर, प्राचार्या डॉ. स्मिता सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होत्या. रमणबाग शाळेत महिला शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. शाळा प्रमुख चारुता प्रभुदेसाई, पर्यवेक्षक मंजूषा शेलूकर व अंजली गोरे, प्रमुख अतिथी मेघा नगरे यांंचा सत्कार करण्यात आला. माजी विद्यार्थी नीलेश गिरमे, उपशाळाप्रमुख जयंत टोले, मेघा नगरे, रवींद्र सातपुते, सुहास देशपांडे, देवेंद्र शिंदे आदी उपस्थित होते. अहिल्यादेवी हायस्कूल फॉर गर्ल्सच्या वेबसाईटचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेच्या प्राजक्ता प्रधान, मिलिंद कांबळे, शाळा समितीच्या अध्यक्षा डॉ. प्रीती अभ्यंकर, मुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर उपस्थित होते.

राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इक्रम खान यांच्यातर्फे वडगाव शेरीतील रामवाडी वसाहतीत राहणाऱ्या महिलांना संसार उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. वयाची शंभर वर्षे पूर्ण केल्याबद्दल हारुबाई बनसोडे यांचा सन्मानही करण्यात आला. माजी नगरसेवक राजू शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते एलिझाबेथ वर्गीस आदी उपस्थित होते. युगांडा येथे झालेल्या जागतिक विद्यापीठ बुद्धिबळ स्पर्धेत महिला गटात सुवर्णपदक मिळविणारी खेळाडू आकांक्षा श्रीनाथ हगवणे यांना कोकणस्थ परिवारातर्फे विशेष सत्काराने गौरविण्यात आले. या वेळी संस्थेच्या संचालिका क्रांती शितोळे, वैशाली टेंबवलकर, श्वेता गानू, सोनिया नेवरेकर, प्रिया पेडणेकर, प्रीती निकम, ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर, पराग गानू, श्रीनाथ हगवणे पवन नेवरेकर आदी उपस्थित होते.

श्री सद्गुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट आणि संजीवन हॉस्पिटलतर्फे महिला पोलीस अधिकाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस निरीक्षक दशरथ हाटकर, राघवेंद्रसिंग क्षीरसागर, ट्रस्टचे अध्यक्ष राजाभाऊ रेवडे, विश्वस्त प्रशांत सूर्यवंशी आदी या वेळी उपस्थित होते.

हमाल पंचायतीतर्फे युनिक एज्युकेशनल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सुरेखा माने यांच्या हस्ते विविध कामांतील कष्टकरी स्त्रियांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार, हमाल पंचायतीचे सरचिटणीस गोरख मेंगडे, उपाध्यक्ष अंकुश अवताडे, दत्तात्रय डोंबाळे, हमाल नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष मंगेश फुंदे, हमाल मजूर सोसायटीचे अध्यक्ष सतीश हळंदे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. मध्य रेल्वेच्या पुणे विभागातर्फे महिला कर्मचाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. ताडीवाला रस्ता येथे रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला बॅरकचे उद्घाटनही करण्यात आले. महिला सामाजिक सेवा संघटनेच्या विभागप्रमुख स्वाती वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त प्रियंका शर्मा आदी या वेळी उपस्थित होते.

Story img Loader