पुणे : सहकार क्षेत्राला अधिक व्यापक आणि बळकट करण्यासाठी यंदाचे वर्ष (२०२५) हे ‘आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे ‘सहकारातून समृद्धीकडे’ या संकल्पनेतील उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणखी प्रयत्न गरजेचे आहे. सेवा सोसायट्या आणि क्रेडिट सोसायट्यांची उपयुक्तता वाढत असून, सेवा सोसायट्यांना विविध उपक्रमांशी जोडून सक्षम बनवले जात आहे,’ असे मत केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शनिवारी व्यक्त केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत आयोजित सिकटॅब आंतरराष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. ‘डिजिटल नवोन्मेष आणि मूल्यसाखळीच्या माध्यमातून सहकारी संस्थांचे सशक्तीकरण’ या विषयावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेत मॉरिशस, बँकॉक, नेपाळ, श्रीलंका, केनिया, भूतान, झांबिया असे विविध १२ देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. लाओ पीडीआरचे उपमहासंचालक अनोसॅक फेंगथिमावोंग, गांबिया सहकाराचे रजिस्ट्रार जनरल अॅबा जिब्रिल संकरेह, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट संस्थेचे संचालक प्रा. पार्थ रे, इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंट गुजरातचे उमाकांत दास, वॅम्नीकॉम आणि सिकटॅबच्या संचालक डॉ. हेमा यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, ‘केंद्र सरकारकडून सहकार आणि समृद्धीच्या दिशेने वाटचाल सुरू असून सहकार चळवळीला भक्कम आधार देण्यासाठी ग्रामीण भागासह सर्व ठिकाणी ५६ महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. त्यानुसार सेवा सोसायट्या आणि केडिट सोसायट्यांची उपयुक्तता वाढत आहे. उत्पन्नाचे स्राोत निर्माण होऊन व्यावसायिकता, रोजगारभिमुखता वाढत आहे. सेवा सोसायट्यांना विविध उपक्रमांशी जोडून सक्षम बनवले जात आहे. सेवा सोसायट्यांमध्ये जन औषधी केंद्र, किसान समृद्धी केंद्र सुरू करण्यात आले आहे. तसेच एलपीजी घरगुती सिलिंडर वितरण, कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसी), विविध सुलभ सेवा प्रदान करण्यात येत आहेत. त्यामुळे सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागापासून शहरापर्यंत आणखी व्यापक पद्धतीने विस्तार होणे गरजेचे आहे.’