इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी-कुगाव पुलाच्या कामाला सुरुवात झाल्याने इंदापूर-करमाळा तालुक्यांतील ऋणानुबंध ५० वर्षांनंतर पुन्हा प्रस्थापित होणार आहेत. उजनी जलाशयामुळे दोन्ही तालुक्यांतील दळणवळण जिकिरीचे झाले होते. दीर्घ काळापासून असलेल्या जोडपुलाच्या मागणीला निवडणुकीपूर्वी मंजुरी मिळाली. आता प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे.
भीमा नदीकाठच्या पाणवठ्यावर हमखास भेटणाऱ्या दोन जिल्ह्यांतील लोकांमध्ये ५० वर्षांपूर्वी ऋणानुबंध जुळले होते. मात्र, उजनी धरणाच्या पाण्यामुळे त्यात दुरावा निर्माण झाला होता. उजनी धरणाच्या निर्मितीनंतर इंदापूर तालुक्यातील गावांना करमाळा तालुक्यातील हाकेच्या अंतरावरील गावात जाण्यासाठी रस्ते मार्गाने ८० ते ९० किलोमीटरचा वळसा घालून किंवा जलमार्गाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत होता. जलवाहतुकीत ५०हून अधिक प्रवाशांना जलसमाधीही मिळाली होती. त्यामुळे उजनी जलाशय जोडपुलाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. विधानसभा निवडणुकीपूर्वी या मागणीने जोर धरला होता. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूल उभारणीची घोषणा तातडीने केली आणि निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी कामाचे भूमिपूजनही झाले होते. त्यानंतर या कामाला आता प्रत्यक्ष प्रारंभ झाला आहे. त्याबाबत दोन्ही काठच्या नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
हेही वाचा >>>पडळकरांच्या टीकेला विरोध करायला हवा होता; युतीतील राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांची अपेक्षा
करमाळा तालुक्यातील भीमा नदीकाठच्या गावांसाठी ५० वर्षांपूर्वी इंदापूर ही मोठी बाजारपेठ होती. शिक्षणासाठीही अनेक विद्यार्थी इंदापूरला येत असत. मात्र, उजनी जलाशयामुळे त्यामध्ये खंड पडला होता. या दोन्ही ठिकाणांना जोडणाऱ्या या पुलाचे काम सुरू झाल्याने दोन्ही बाजूने दळणवळण सुरू होणार आहे.- भरत शहा, माजी उपनगराध्यक्ष, इंदापूर