इंदापूर : उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील शिरसोडी- कुगाव या महत्वकांशी पुलाच्या कामाला वेग आला आहे. सुमारे तीनशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या या पुलाच्या कामाला उपमुख्यमंत्री अजित पवार क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी अल्पावधीतच पूल मंजूर करून प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे .सध्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये काम सुरू झाले आहे. या कामासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने या कामाबाबत परिसरामध्ये लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, हे काम कसे चालते हे पाहण्यासाठी परिसरातील लोकांची पावले पुलाच्या कामाकडे वळू लागले आहेत.
४५ वर्षांपूर्वी उजनी धरणात पाणी आडण्यास प्रारंभ झाल्यानंतर भीमा नदीच्या काठावरील हाकेच्या अंतरावरील ऐलतीर व पैल तीरावरील गावे एकामेकांपासून दुरावली होती. या गावांचे धरण होण्याच्या अगोदर मोठे स्नेह संबंध होते. देवाण-घेवाण, व्यवहार होते. बाजारहाटासाठी लोक या बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे सहज जात येत होते .मात्र उजनी धरणाचे पाणी आडण्यास प्रारंभ झाल्यानंतर या दोन्ही गावांचे संबंध संपुष्टात आले होते .
या गावांची एकरूप होऊन जोडलेली गेलेली नाळ तुटली तुटली होती .मात्र, इंदापूर तालुक्यातील शिरसोडी व करमाळा तालुक्यातील कुगाव या फुलाच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्याचे ऋणानुबंध पुन्हा जुळणार आहेत. या पुलाच्या कामासाठी इंदापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष भरत शहा तसेच कुगावच्या माजी सरपंच तेजस्विनी कोकरे धुळाभाऊ कोकरे आदींनीही सातत्याने प्रयत्न केले .या प्रयत्नाला आता मूर्त रूप येत आहे.त्याशिवाय मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील अंतर १०० किलोमीटर कमी होऊन मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग तयार होणार आहे. लोकांची आवक – जावक वाढुन इंदापूर शहराच्या आर्थिक उलाढालीत वाढ होईल.
भाजीपाला ,तरकारी, व केळी मालाला पुणे- मुंबई बाजारपेठ तात्काळ उपलब्ध होणार आहे. उसासाठी पुणे जिल्ह्यातील पर्यायी कारखाने उपलब्ध होणार असूनकेळी निर्यातीस मुंबई बंदरावर जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे.परिसरात रोजगार निर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढून उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पर्यटनाच्या मोठ्या संधी निर्माण होतील.
उजनी धरण झाल्यानंतर कधी आयुष्यात वाटलं नव्हतं या धरणावर पूल होईल. परंतु हे अत्यंत अवघड असलेलं काम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अत्यंत धाडसाने केले आहे. त्याबाबत अजित पवार यांचे १०५ वय वर्षे असलेले केरुनाना कोकरे यांनी आभार मानले.