सत्ता असून कामे होत नाहीत, शासकीय कमिटय़ा जाहीर होत नाहीत, पक्षाचे मंत्री संघटनेला वेळ देत नाही अन् कार्यकर्त्यांना ताकदही देत नाही, राजकीयदृष्टय़ा महत्त्वाचे शहर असूनही पक्षपातळीवर पिंपरीकडे दुर्लक्ष आहे, अशी व्यथा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यापुढे मांडण्यात आली. कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्दय़ांचा परामर्ष गांधींनी भाषणात घेतला व मंत्र्यांनी संघटनेसाठी वेळ द्यावा, अशी तंबी दिल्याचे सांगण्यात येते.
राहुल गांधी बुधवारी पुण्याच्या दौऱ्यावर होते. जिल्हानिहाय प्रातिनिधिक दोन जणांचे म्हणणे त्यांनी ऐकून घेतले, तेव्हा पिंपरीचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर व माजी नगरसेवक बाबू नायर यांनी पिंपरीतील कार्यकर्त्यांच्या व्यथा मांडल्या. भोईर म्हणाले, कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही. पिंपरीचे स्वतंत्र अस्तित्व असूनही महत्त्व दिले जात नाही. राष्ट्रवादीशी जवळीक असल्याची टीका आपल्यावर केली जाते. प्रत्यक्षात राष्ट्रवादीशी कोणाची ‘अंडरस्टँिडग’ आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल. भोईर यांचा रोख संपर्कमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याकडे होता, असे सांगण्यात येते. नायर म्हणाले, प्रदेशाध्यक्षांचे काम चांगले आहे. मुख्यमंत्र्यांची स्वच्छ प्रतिमा व पारदर्शक कारभार पक्षासाठी फायदेशीर ठरतो आहे. तथापि, कार्यकर्त्यांना ताकद मिळत नाही. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा निर्णय नाही. शासकीय कमिटय़ा, म्हाडा व पिंपरी प्राधिकरणाचा निर्णय होत नाही. भोईरांचे काम चांगले आहे. मात्र, जिल्हाशाखेला विश्वासात न घेता निर्णय होतात. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी व येथील प्रश्न सोडवावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, दौऱ्याच्या निमित्ताने शहरातील गटबाजीचे राजकारण उफाळून आले. भोईरांनी समर्थकांना प्रवेशिका मिळवून दिल्या. मात्र, विरोधकांना ठरवून दूर ठेवल्याची तक्रार आहे. नायर हे भोईरांचे समर्थक असल्याने त्यांनाच बोलण्याची संधी दिली. त्यामुळे त्यांनी भोईरांचे गोडवे गायले. शहर काँग्रेसची दुरवस्था मांडणारे निवेदन काही पदाधिकाऱ्यांनी तयार केले होते. मात्र, गांधी यांच्यापर्यंत ते पोहोचू शकले नाही. बालेकिल्ला असलेल्या पिंपरीत वाताहात झाली, नगरसेवकांची संख्या घटली, पालिका निवडणुकीत पक्षाकडे उमेदवार नव्हते, राष्ट्रवादीच्या कलाने काँग्रेसचा कारभार सुरू आहे, असे मुद्दे त्यात होते.

Story img Loader