पुणे : जुन्या निवृत्ती वेतन योजनेच्या मागणीसाठी पुकारलेला संप सोमवारी सायंकाळी मागे घेण्यात आला. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील शासकीय कार्यालयांचे कामकाज मंगळवारपासून पूर्ववत झाले. परिणामी नागरिकांची खोळंबलेली कामे मार्गी लावण्यासाठी गर्दी झाली होती. मात्र, बुधवारी (२२ मार्च) गुढीपाडव्यानिमित्त शासकीय कार्यालये बंद राहणार आहेत. दरम्यान, शहरासह जिल्ह्यातील दस्त नोंदणीची सर्व कार्यालये मंगळवारी सुरू झाली, मात्र मृत्युंजय अमावस्या असल्याने नागरिकांनी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची नोंदणी करण्याकडे पाठ फिरवली.
शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारला होता. या काळात सर्व शासकीय कार्यालये अंशत: सुरू असल्याने पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील कोट्यवधींची कामे ठप्प झाली होती. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे, विविध दाखले, शासकीय योजना, लाभ, वाहन नोंदणी, शहरातील काही, तर ग्रामीण भागातील पूर्णत: मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी आदी कामे संपकाळात बंद होती. ही सर्व कामे मंगळवारपासून पूर्ववत झाली.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवड : पगार मागितला म्हणून साफसफाई करणाऱ्या महिलेला बेदम मारहाण
दस्त नोंदणीसाठी गुरुवारपासून गर्दीची शक्यता
नोंदणी व मुद्रांक विभागातील कर्मचारीदेखील संपात सहभागी झाले होते. त्यामुळे शहरातील काही, तर ग्रामीण भागातील सर्व (२१) दस्त नोंदणी कार्यलये बंद होती. ही सर्व कार्यालये मंगळवारी सुरू झाली. मात्र, मंगळवारी अमावस्या असल्याने नागरिकांनी मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहारांची दस्त नोंदणी करण्यास उत्साह दाखविला नाही. मात्र, गुरुवारपासून दस्त नोंदणी कार्यालयांत मार्चअखेरमुळे नागरिकांची झुंबड उडण्याची शक्यता नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने व्यक्त केली.