स्वारगेट येथील उड्डाणपुलाच्या श्रेयावरून भाजप आणि काँग्रेसने सुरू केलेल्या वादात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शनिवारी समंजस नेत्याचे दर्शन घडवले आणि या मनाचा मोठेपणा दाखवणारे दादाच या वादातजिंकले! ‘त्यांनी भूमिपूजन केले काय आणि मी केले काय, चला, एकदाचे काम झाले.. पुणेकरांसाठी काम सुरू झाले, हे महत्त्वाचे आहे..’ असे सांगणारे दादा कार्यक्रमानंतर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले.
जेधे चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री जयदत्त श्रीरसागर यांच्या उपस्थितीत शनिवारी आयोजित करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या आधीच आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ आणि भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने नियोजित ठिकाणाच्या अलीकडे भूमिपूजन केले. या कामाचे श्रेय आम्हाला मिळू नये असा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न असल्यामुळे आम्ही भूमिपूजन केले, असा दावा या नेत्यांनी केला.
भाजपने आधीच भूमिपूजन केल्यामुळे या प्रकाराबाबत अजितदादा मुख्य कार्यक्रमात त्यांच्या शैलीत विरोधकांचा समाचार घेतील, असे सर्वानाच वाटत होते. कार्यक्रमात बोलतानाही आमदार माधुरी मिसाळ आणि आमदार मोहन जोशी यांनी पुलाच्या कामाबद्दल अनेक वर्षे त्यांनीच पाठपुरावा केल्याचे सांगितले आणि त्यामुळे कामाचे त्याचे श्रेय आमचेच आहे असा दावा पुन्हा एकदा केला.
या वादाच्या पाश्र्वभूमीवर दादांनी मात्र कामाचे श्रेय स्वत:कडे वा राष्ट्रवादीकडे न घेता ज्या ज्या कोणी या पुलासाठी प्रयत्न केले, त्या सर्वाना या कामाचे श्रेय आहे, असे जाहीर करून मोठाच समंजसपणा दाखवला. आपण आपसात श्रेयाचा कितीही जरी वाद इथे घातला, तरी जनता बरोबर सर्वाना ओळखून असते. जनता मतदानाच्या वेळी बरोबर काम करणाऱ्यालाच मत देते. ज्याने खरोखर काम केलेले असते त्यालाच लोक निवडून देतात, असे सांगून दादा म्हणाले, की आता बघा, पुण्याला चार-पाच खासदार आहेत. त्यातला एकतरी इथे आहे का. ते सगळे आपापल्या कामात आहेत. त्यांना माहिती आहे की कोणत्या कामाचे श्रेय कोणाला मिळणार आहे. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या पुलासाठी प्रयत्न केले त्यांना त्यांना मी श्रेय देतो.
पुलाच्या कामाची कुदळ आधीच मारली गेली आहे हे मला जेव्हा समजले, तेव्हा मी भूमिपूजनानंतर पुन्हा कुदळ मारली नाही. मी फक्त कोनशिलेचे अनावरण केले. कोणाच्या हस्ते का होईना कुदळ मारली गेली आहे. पुणेकरांसाठी काम सुरू झाले हे महत्त्वाचे, असेही दादांनी आवर्जून सांगितले.
पुलाचे भूमिपूजन भाजपने आधीच केल्याचे कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वी दादांना सांगण्यात आले होते. तेव्हा ते दुसऱ्या एका कार्यक्रमात होते. त्याबाबतची माहिती दादांना अंकुश काकडे यांनी दिली. त्या वेळीही त्यांना काय करायचे आहे ते करू द्या, तुम्ही लक्ष देऊ नका, असे काकडे यांना दादांनी सांगितले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा