चिंचवडच्या ‘एम्पायर इस्टेट’ या उच्चभ्रूंच्या वसाहतीच्या मध्यभागातून जाणाऱ्या तब्बल १०० कोटींहून अधिक खर्चाच्या उड्डाणपुलाचे काम कित्येक महिन्यांपासून रखडल्याने अनेक समस्या निर्माण झाल्या असतानाच, बीआरटीमुळे कमी झालेला रस्ता, दररोजची वाहतूक कोंडी व त्यातून होणाऱ्या वादाची त्यात भर पडली आहे. महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे येथील अडीच हजार सदनिकाधारक कमालीचे त्रस्त झाले आहेत. आयुक्तांनी लक्ष द्यावे व यातून आमची सोडवणूक करावी, अशी मागणी त्यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यात सुधारणा न झाल्यास मुंबई-पुणे महामार्ग बंद करू, कर भरणे बंद करू, वेळप्रसंगी पालिकेला टाळे ठोकू, असा इशारा संतप्त रहिवाशांनी दिला.
स्थानिक नगरसेवक प्रसाद शेट्टी, काळूराम पवार, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर यांनी पत्रकार परिषदेत या समस्येला वाचा फोडली. रहिवाशांचे प्रतिनिधी एस. एस. शेवाळे, संतोष पिंगळे, संपत आतोरे, रवी खंडेलवाल, चंद्रकांत बढे, मीनाक्षी सपकाळ आदींसह मोठय़ा संख्येने नागरिक उपस्थित होते. या वसाहतीत दहा हजाराची लोकवस्ती आहे. दीड किलोमीटर लांबी व ३० मीटर रूंदीच्या उड्डाणपुलाचे कंत्राट ‘गॅमन इंडिया’ कंपनीला मिळाले आहे. कामाची निर्धारित मुदत ५ सप्टेंबर २०१३ लाच संपली आहे. मात्र, अवघे ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. काम केव्हा पूर्ण होईल, याची माहिती पालिकेकडून कोणालाही देता येत नाही. मागील तीन वर्षे रहिवाशांनी प्रचंड त्रासात काढली आहेत. प्रदूषण, वाहनांच्या कर्कश आवाजाचा त्रास आहे. लगतची दुकाने, मॉलमध्ये येणारी वाहने वसाहतीच्या प्रवेशद्वारासमोर लावली जातात. रहिवाशांना आपली वाहने आतमध्ये आणता येत नाहीत. बीआरटीमुळे रस्ता खूपच छोटा झाला असून दररोज वाहतुकीची कोंडी होते, त्यातून वादंग होतात. सीएनजीसाठी रिक्षांची व मोटारींची लांब रांग लागलेली असते. त्यामुळे आधीची समस्या आणखी जटिल झाली असून अनेकांनी सदनिका विकून दुसरीकडे जाण्याचा निर्धार केला आहे. वर्षांकाठी आठ कोटींचा कर रहिवासी भरतात, त्या तुलनेत सुविधा काहीच नाही. येथील प्रलंबित प्रश्नांची वेळीच सोडवणूक न झाल्यास आक्रमक पध्दतीने आंदोलन करू, असा इशारा या वेळी देण्यात आला.
 
कंत्राटदारावर मेहेरबानी?
पुलाचे काम करणाऱ्या कंत्राटदार कंपनीवर महापालिकेचे अधिकारी मेहेरनजर आहेत. कित्येक महिन्यांपासून काम ठप्प असूनही पालिका कारवाई करत नाही. नगरसेवकांनी आयुक्तांकडे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वेळोवेळी हा विषय मांडला. तथापि, परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याचे रहिवाशांनी या वेळी निदर्शनास आणून दिले.

 

Story img Loader