पुणे : अमेरिकेतील संस्थांमध्ये संशोधकांना संशोधनासाठीची सर्व मदत प्रयत्नांनी मिळू शकते. मात्र भारतातील संशोधकांना ती तितक्या प्रमाणात मिळवणे कठीण जाते. भारतातही अनेक गुणवान संशोधक आहेत. पण संशोधनासाठी निधी मिळेल का, साधने उपलब्ध होतील का, यासह प्रशासकीय अनिश्चिततेची चिंता त्यांना भेडसावते. विविध अडचणींना सामोरे जात भारतातील वैज्ञानिक करत असलेले संशोधन कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. गीता नारळीकर यांनी मांडले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जैवरसायनशास्त्रात जागतिक स्तरावरील विख्यात शास्त्रज्ञ डॉ. गीता नारळीकर यांची त्यांच्या संशोधनातील योगदानासाठी गेल्या वर्षी अमेरिकेतील प्रतिष्ठित नॅशनल अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सच्या सदस्यपदी निवड झाली. त्यांची आणखी एक ओळख म्हणजे, त्या ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ  डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ गणितज्ञ डॉ. मंगला नारळीकर यांच्या कन्या आहेत. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या ‘वज्र’ (व्हिजिटिंग अ‍ॅडव्हान्स्ड जॉईंट रीसर्च) या योजनेअंतर्गत डॉ. नारळीकर भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेत (आयसर पुणे) अध्यापनासाठी आल्या आहेत. या निमित्ताने ‘लोकसत्ता’ने डॉ. गीता नारळीकर यांच्याशी संवाद साधला.

अमेरिका आणि भारतातील संशोधन संस्थांतील फरकाविषयी डॉ. नारळीकर म्हणाल्या,की अमेरिकेतील संस्थांमध्ये संशोधकांना संशोधनासाठीची सर्व मदत प्रयत्नांनी मिळू शकते. मात्र भारतातील संशोधकांना ती मदत तितक्या प्रमाणात मिळवणे कठीण जाते. संशोधकांना आवश्यक ती मदत मुक्तपणे उपलब्ध करून दिल्यास त्यांना प्रोत्साहन मिळेल. भारतात अनेक गुणवान संशोधक आहेत, पण संशोधनासाठी निधी मिळेल का, साधने उपलब्ध होतील का आणि प्रशासकीय अनिश्चिततेचीही चिंता त्यांना असल्याचे जाणवते. विविध प्रकारच्या अडचणींना सामोरे जात वैज्ञानिक संशोधनाचे काम करतात ही कौतुकास्पद बाब आहे.

अमेरिकेत सहजपणे विद्यार्थी प्रश्न विचारतात. या प्रश्नांतूनच संशोधनासाठीचे पूरक वातावरण निर्माण होते. माझ्याच विद्यार्थ्यांचं उदाहरण देते. सामान्यपणे संशोधन प्रक्रियेत प्रथिन धुरकट झाले म्हणजे ते खराब झाल्याचे मानले जाते. त्यामुळे मी माझ्या संशोधक विद्यार्थ्यांला त्या संदर्भात काय करायचे हे सांगितले. पण माझे न ऐकता तो त्याच्या पद्धतीने काम करत राहिला. त्यातूनच गुंडाळलेल्या डीएनएचे ड्रॉपलेट्स तयार होतात हा निष्कर्ष हाती आला. आता तो विद्यार्थी माझेच ऐकत राहिला असता, तर हे संशोधन हाती आलेच नसते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्वत:हून पुढाकार घ्यावासा वाटेल असे मोकळे वातावरण असायला हवे, असे डॉ. नारळीकर यांनी सांगितले.

भारतातील संशोधकांना आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये जाणे अडचणीचे होत असल्याचे जाणवते. आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण त्यातूनच संशोधन क्षेत्रात होत असलेले नवे काम, व्यक्ती यांचा परिचय होतो, आंतरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या कामाच्या तुलनेत आपण करत असलेल्या कामाचा अंदाज येतो. आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होण्याची संधी मिळणे संशोधकांच्या विकासासाठी गरजेचे आहे. त्यासाठीचा निधी उपलब्ध करून द्यायला हवा, असे डॉ. नारळीकर म्हणाल्या.

महिलांसोबतचा भेदभाव हा जागतिक प्रश्न आहे. काही मोजक्या देशांचा अपवाद वगळता जगभरात महिलांसोबत भेदभाव होतो. महिलांना त्यांचे करिअर करतानाच घराची जबाबदारीही पूर्ण करावी लागते. त्यामुळे महिला एकाचवेळी दोन कामे करत असतात. त्याचा विज्ञानात काम करणाऱ्या महिलांवर परिणाम होतो. पुरुषांइतकेच किंवा पुरुषांपेक्षा जास्त काम करूनही त्यांच्या कामाची पुरेशी दखल घेतली जात नाही त्याचे कारण स्त्रियांच्या क्षमतेबद्दल असलेला चुकीचा पूर्वग्रह आहे. अमेरिकेत आमच्या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांमध्ये जवळपास ५० टक्के मुली असतात. मात्र प्राध्यापकांमध्ये महिलांचे प्रमाण २५ टक्केच आहे, असे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारच्या ‘वज्र’ या योजनेअंतर्गत भारतात येऊन शिकवण्याची संधी मिळाल्याचा आनंद वाटतो. या निमित्ताने भारतातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळत असल्याचा, संशोधनासाठी हातभार लावता येत असल्याचा आनंद असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

आवडते ते करणे, नेहमी शिकत राहण्याचा गुण आई-वडिलांकडूनमी काय शिकावे, कोणत्या क्षेत्रात करिअर करावे या बाबत माझ्या आई-वडिलांकडून कोणतेही दडपण नव्हते. माझे वडील किती मोठे शास्त्रज्ञ आहेत हे आम्हाला बाहेरून कळायचे. घरी ते सर्वसामान्य वडिलांप्रमाणेच असायचे. आई-वडिलांकडून नेहमीच मला प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळाली. आपल्याला जे आवडते ते करणे आणि सतत शिकत राहणे हे गुण त्यांच्याकडून शिकले. संशोधनच कर, भौतिकशास्त्रातच काम कर असे त्यांनी कधीही सांगितले नाही. खरेतर मला भौतिकशास्त्रातच काम करायचे होते. पण आयआयटीमध्ये भौतिकशास्त्राला प्रवेशासाठी मला तितके गुण नसल्याने थोडय़ा नाराजीने रसायनशास्त्राकडे वळण्याचे ठरवले. पण प्रत्यक्ष अभ्यास सुरू झाल्यावर त्यात आणि जीवशास्त्रात रस वाटू लागला. त्यातूनच पुढे जैवरसायनशास्त्रासारख्या विषयात संशोधनाकडे वळल्याचे डॉ. नारळीकर यांनी सांगितले.

संशोधनाचा लाभ..

शरीरातील ‘डीएनए’चा धागा गुंडाळला जाणे, त्याची प्रक्रिया, पेशींमधील रचना, त्यांचा या डीएनएचा धागा गुंडाळला जाण्याशी असलेला संबंध या बाबतचे संशोधन डॉ. नारळीकर करत आहेत. खूप जास्त गुंडाळल्या गेलेल्या डीएनएचे ड्रॉपलेट्स (थेंब) तयार होतात, पेशींनुसार हे ड्रॉपलेट बदलतात असे त्यांच्या संशोधनातून आढळून आले. मूलभूत अशा या संशोधनातून कर्करोगासारख्या आजारांवर नवीन औषध, उपचार पद्धती विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण दिशा मिळू शकणार आहे.

भारतीय संस्कृतीत मोठय़ांचा आदर केला जातो. पण त्यामुळे अनेकदा विद्यार्थी प्रश्न विचारत नाहीत. विज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना कुतूहल वाटणे, त्याबद्दल त्यांनी प्रश्न विचारणे आवश्यक आहे. प्रश्न विचारणे म्हणजे मोठय़ांचा अनादर करणे नसते. – डॉ. गीता नारळीकर