पुणे : एन.डी.ए. चौक (चांदणी चौक) उड्डाणपूल प्रकल्पातील मुळशी-मुंबई मार्गाच्या उर्वरित भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणी दाखल प्रकरणात उच्च न्यायालयाने भूसंपादनाला परवानगी दिली असल्याने या ठिकाणचे उर्वरित काम पुढील एक महिन्यात पूर्ण होईल. त्यामुळे मुळशीकडून मुंबई कडे जाणारी वाहतूक सुरळीत होईल, असा दावा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) गुरुवारी करण्यात आला.
मुळशी-मुंबई मार्गिकेचे काम पुणे महानगर पालिकेकडून पूर्ण झाले नव्हते. भूसंपादन अधिकाऱ्यांनी केलेल्या निवाड्याविरोधात बाधित मालमत्ताधारकांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. उच्च न्यायालयाने उर्वरित भूसंपादनाचे काम करण्यास परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे उर्वरित काम एक महिन्यात पूर्ण होणार आहे. चांदणी चौकातील जुना पूल पाडल्यामुळे सध्या सेवा रस्ता आणि इतर कामासाठी दोन्ही बाजूकडील खडकांचे खोदकाम प्रगतीत आहे. सद्य:स्थितीत पुलाच्या ठिकाणी मुंबई-सातारा पाच मार्गिका आणि सातारा-मुंबईसाठी तीन मार्गिका अशा मार्गिका वाहतुकीसाठी उपलब्ध झाल्या आहेत.
पुणे: वाहतूक हा शहर नियोजनाचाही भाग; पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता
वेदभवन समोरील सेवा रस्त्याचे काम बऱ्याच दिवसापासून बंद असल्याने वाहतुकीला अडचणी येत होत्या. सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्याने अस्तित्वात असलेल्या सेवा रस्त्याच्या भरावाचे काम करण्यात आले असून उर्वरित रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. बेंगळुरू-मुंबई महामार्गावरील सद्य:स्थितीतील चौपदरी रस्त्याचे सहापदरीकरण करण्यासाठीचे सीमाभिंत आणि माती भरावाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम १५ दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन आहे, अशी माहिती एनएचएआयचे प्रकल्प संचालक एस. एस. कदम यांनी दिली.
हेही वाचा : लोक करोनाला पार कंटाळले; सीरमच्या १० कोटी लसी गेल्या वाया
दरम्यान, श्रुंगेरी मठाच्या जागेचा ताबा १ सप्टेंबरला पुणे महानगरपालिकेकडून मिळाला असून सेवा रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. बावधनकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गिका सहाचे काम पुढील दीड महिन्यात पूर्ण करण्यात येईल. कोथरुड – वारजे – सातारा हा सेवा रस्ता महामार्गाला जोडला असून वाहतुकीस खुला करण्यात आला आहे. उर्वरित काम पुढील १५ दिवसात पूर्ण करण्यात येईल. एन डी ए ते मुंबई या मार्गिका पाचचे काम प्रगतीत असून पुढील १५ दिवसात पूर्ण होईल. मुळशी ते कोथरूड या रस्त्यावरील जुन्या भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीत असून पुढील दीड महिन्यात ते काम पूर्ण होईल. मुळशी ते सातारा मार्गिकेचे काम जवळजवळ पूर्ण झाले असून त्यावरून मुळशीवरून येणारी वाहतूक १३ सप्टेंबरपासून वळविण्यात आली आहे, असेही कदम यांनी सांगितले.