लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. गाजावाजा करत वर्षभरापूर्वी याचे भूमिपूजन होऊनही हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात झालेली नाही. ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ (पीपीपी) तत्वावर हे हॉस्पिटल उभारण्यात येत आहे.

ज्या कंपनीमार्फत याचे बांधकाम केले जाणार आहे. त्याचा करारनामा, माहिती, सविस्तर प्रकल्प अहवाल याची माहिती उपलब्ध करून दिली जात नसल्याने यामध्ये काहीतरी ‘गौडबंगाल’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कागदपत्रे आणि महत्त्वाची माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून दिली जात नसल्याची तक्रार केली. महापालिकेत पत्रकार परिषद घेत वेलणकर यांनी हा आरोप केला. प्रशासनाने यासंदर्भातील सर्व कागदपत्रे, नोंदी आणि या हॉस्पिटलचे काम नक्की केव्हा सुरू होणार हे जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी केली.

गेल्या वर्षी वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टिस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे भूमिपूजन करण्यात आले होते. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला होता.

या हॉस्पिटलबाबतची अद्ययावत कोणतीही माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे उपलब्ध नसल्याचे वेलणकर यांनी सांगितले. माहितीच्या अधिकारात या विषयाची माहिती मागविल्यानंतरही त्रोटक माहिती दिली जाते. ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल होणार आहे. प्रत्यक्षात त्या जागेवर जाऊन पाहाणी केली.

या ठिकाणी अद्याप कोणतेही काम सुरू झालेले नाही. याची माहिती घेतली असता अनेक संशयास्पद बाबी समोर आल्याचे वेलणकर म्हणाले. संबंधित हॉस्पिटल पीपीपी तत्वावर उभारण्याचा करार १७ ऑगस्ट २०२३ ला झाला. विशेष म्हणजे हा करार स्टॅम्प पेपरवर झालेला नाही. करार झाल्यानंतर १२० दिवसांमध्ये हॉस्पिटलची उभारणी आणि ती चालविण्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) सादर करणे बंधनकारक होते. परंतु, प्रशासनाने हा डीपीआर उपलब्ध करून न दिल्याने तो तयार केला की नाही, याबाबत शंका आहे, असे वेलणकर म्हणाले.

करारानुसार संबंधित कंपनीने एकूण कामाच्या रकमेच्या पाच टक्के रक्कम अर्थात १७ कोटी रुपये सिक्युरिटी डिपॉझीट म्हणून महापालिकेला देणे बंधनकारक आहे. त्या बाबतची कोणतीही कागदपत्र प्रशासनाकडे नसल्याने ती रक्कम भरली की नाही, हे देखिल समजत नाही. या विशेष प्रकल्पासाठी शासन समिती स्थापन करणार होते. परंतु, या समितीचीही माहिती प्रशासनाकडे नसल्याचे दिसून येत आहे. प्रशासन ही माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याने यात काळेबेरे असल्याचा संशय येतो.

प्रशासनाने पुढील आठवड्याभरात वरील सर्व मुद्द्यांचे स्पष्टीकरण द्यावे आणि संबंधित कागदपत्र जाहीर करावीत, अशी आमची मागणी असल्याचे वेलणकर यांनी सांगितले.

याबाबत महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांना विचारले असता, ते म्हणाले वारजे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे काम लवकरच सुरू होईल. काही परवानग्या घेणे बाकी असल्याने काम सुरू झालेले नाही. या हॉस्पिटलसाठी संबंधित कंपनीने परदेशी वित्त संस्थेकडून कर्ज घेतले आहे. हे कर्ज मंजूर झाले आहे. बांधकाम परवानगी मिळाल्याशिवाय बँक कर्ज देत नाही.

Story img Loader