मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर सेवा रस्ता करणे गरजेचे आहे. महापालिकेने हे काम अद्याप केले नाही. नवले पूल परिसरातील तीव्र उतारावर अपघाताच्या घटना घडल्या आहेत. तेथील अपघात रोखणे; तसेच तीव्र उतार कमी करण्यासाठी तातडीने रस्ते वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे, असे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
हेही वाचा >>>निम्म्या पुण्याचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
नवले पूल परिसरात रविवारी रात्री दोन अपघात झाले. भरधाव ट्रकने ४८ वाहनांना धडक दिली. अपघातात वाहन चालक जखमी झाले. अपघातानंतर सोमवारी सकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी नवले पूल परिसराची पाहणी केली. त्या म्हणाल्या, की या भागात सातत्याने अपघात होत असल्याने लोकसभेत मी गेल्या वर्षी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचे काम येत्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात येईल; तसेच अपघात रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन दिले होते. पुणे महापालिकेने या भागात सेवा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. मात्र, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. नवले पूल परिसरातील तीव्र उताराच्या परिसरात तज्ज्ञांची मदत घेणे गरजेचे आहे. तातडीने उतार कमी करण्यासाठी उपाययोजना केल्यास गंभीर स्वरुपाचे अपघात कमी होतील, असेही सुळे यांनी सांगितले.
हेही वाचा >>>पुणे: ‘दरी पुलाजवळ चेक पोस्ट तयार करण्यात येणार’; राष्ट्रीय महामार्ग अधिकारी संजय कदम यांची माहिती
अपघातानंतर महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण; तसेच पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. सर्व विभागातील अधिकाऱ्यांकडून पुन्हा या भागाची पाहणी करण्यात येणार असल्याचे सुळे म्हणाल्या.
हेही वाचा >>>पुण्यात पादचाऱ्यांकडील मोबाइल चोरीचे प्रकार वाढले
पुन्हा गडकरींची भेट
नवले पूल आणि बाह्यवळण मार्गावरील अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी मी पुन्हा नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. बाह्यवळण मार्ग अपघातमु्क्त करण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येतील, यादृष्टीने चर्चा करण्यात येणार आहे. अपघात रोखण्यासाठी वाहनचालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सुप्रिया सुळे यांनी नमूद केले.