लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे : महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील सांडपाणी वाहिन्यांची कामे निकृष्ट दर्जाची झाल्याच्या आरोपानंतर शासकीय अभियांत्रिकी विद्यापीठामार्फत या कामांची तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गावातील सांडपाणी वाहिन्यांच्या कामाची पोलखोल होण्याची शक्यता आहे.
विधिमंडळाच्या अधिवेशनात खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या कामांची उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. विधीमंडळातील आश्वासनासंदर्भातील पूर्तता करण्यासंदर्भात मुंबईत बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी दिली.
आणखी वाचा-पुण्याला यंदा मिळणार पाणी कमी?…जाणून घ्या किती?
महापालिका हद्दीमध्ये ऑक्टोबर २०१७ मध्ये ११ गावांचा आणि त्यानंतर जुलै २०२१ मध्ये २३ गावांचा अशा एकूण ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. त्यापैकी समाविष्ट ११ गावांसाठी महापालिकेने ४२५ कोटींचा सांडपाणी वहन व्यवस्था आराखडा केला असून त्याला स्थायी समितीनेही मंजुरी दिली होती. या गावातील २०४७ सालापर्यंतची लोकसंख्या गृहीत धरून हा आराखडा करण्यात आला आहे. त्यानुसार ११ गावांमध्ये १८३ किलोमीटर लांबीच्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कामे केली जाणार आहेत. तसेच दोन सांडपाणी प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यांची कामे सुरू असून, त्याबाबत आमदार तापकीर यांनी आक्षेप घेतला होता.