घाऊक फळभाजी बाजाराचे मार्केटयार्डातील आडते, कामगार संघटनेचा निर्णय

 

पुणे: करोनामुळे मार्केटयार्डातील फळभाजी बाजारातील सर्व व्यवहार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय आडते आणि कामगार संघटनेकडून घेण्यात आल्यानंतर शुक्रवारी झालेल्या बैठकीत येत्या बुधवारपासून (१ एप्रिल) बाजारआवारातील कामकाज नियमित करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला. फळभाजी, भुसार मालाचा तुटवडा जाणवल्यास त्याची झळ सामान्यांना बसणार असून बंदबाबत विचार करावा, असे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीकडून करण्यात आले होते.

श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते संघटना आणि कामगार संघटनेची  बैठक शुक्रवारी मार्केटयार्डात पार पडली. या बैठकीत बाजारआवारातील कामकाज १ एप्रिलपासून नियमित करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती आडत संघटनेचे अध्यक्ष विलास भुजबळ, उपाध्यक्ष युवराज काची आणि कामगार संघटनेचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली. करोनामुळे कामगारात भीती आहे. कामगार, आडते जरी बाजारात आले तरी त्यांची पोलिसांकडून अडवणूक केली जाते. त्यामुळे बाजार घटकातील सर्वाना अत्यावश्यक  सेवेतील ओळखपत्र देण्याची गरज असल्याचे सांगून आडते संघटना, दी पूना र्मचट्स चेंबर आणि कामगार संघटनेकडून ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, भुसार, फळबाजी विभाग बंद राहिल्यास त्याची झळ सामान्यांना बसेल. त्यासाठी बंद मागे घेण्यात यावा, असे आवाहन बाजार समितीकडून करण्यात आले होते.

त्यानंतर भुसार विभागातील व्यापाऱ्यांनी बंद मागे घेऊन गुरुवारपासून (२६ मार्च) कामकाज नियमित सुरू करण्याचा निर्णय घेतला. मार्केटयार्डात पार पडलेल्या बैठकीनंतर आडते संघटनेचे उपाध्यक्ष युवराज काची म्हणाले, व्यापार सुरळीत झाला पाहिजे. रोज खरेदीसाठी येणाऱ्या प्रमुख खरेदीदारांना ओळखपत्र देण्याची गरज आहे. खरेदीदारांना किरकोळ बाजारात फळे, भाजीपाला विक्रीस परवानगी दिली तरच ते घाऊक बाजारातून खरेदी करतील. ओळखपत्र देण्याची मागणी बाजार समितीकडे करण्यात आली आहे.

कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बाजार समितीने कामगार, हमालांना ओळखपत्र द्यायला हवे. त्यांची पोलिसांकडून अडवणूक होता कामा नये.आरोग्य कर्मचाऱ्यांचा ५० लाखांचा विमा काढण्याचा निर्णय  सरकारकडून घेण्यात आला असून कामगार, हमाल, तोलणार यांचाही विमा काढण्यात यावा. बाजारात करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे, अशी माहिती कामगार संघटनेचे सचिव संतोष नांगरे यांनी दिली.

भाजीपाल्याची टंचाई नाही; गर्दी करू नये

शहरात भाजीपाल्यांची टंचाई नाही. उत्तमनगर येथील बाजार सुरू आहे. भुसार विभाग सुरू झाला आहे. सर्व बाजारआवारात नियमित आवक सुरू झाली आहे. त्यामुळे सामान्यांनी घाबरून जाऊ नये. नागरिकांना भाजीपाल्याचा तुटवडा जाणवणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. किरकोळ खरेदीदारांना बाजारआवारात पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात आला आहे. घाऊक खरेदीदारांना बाजारात प्रवेश देण्यात आला असून  प्रत्येकाला टप्याटप्याने प्रवेश देण्यात येणार आहे. कमीत कमी गर्दी करून जास्तीत जास्त माल खरेदी करावा, असे नियोजन करण्यात आल्याची माहिती कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी दिली. दरम्यान, शुक्रवारी (२७ एप्रिल) बाजार आवारात भाजीपाल्यांच्या १२० गाडय़ांची आवक झाली.