पुणे : शहरातील समान पाणीपुरवठा योजनेचे काम धिम्या असून गतीने सुरू असून दोन वर्षांपूर्वी संपणारे हे काम अजूनही सुरूच आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अजून दोन ते अडीच वर्षाची मुदतवाढ मागण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे.गेले सात वर्षांपासून हे काम सुरू असल्याने पुणेकरांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. कोथरूड विधानसभा मतदार संघात मध्ये समान पाणीपुरवठा योजनेचे काम रखडलेले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे काम पूर्ण होत नसल्याने महापालिकेच्या कामावर कोथरूडचे आमदार आणि उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील या योजनेची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश पाटील यांनी दिले. तसेच, पाणीगळती रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी महापालिकेला केल्या. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच खासदार प्रा. मेधा कुलकर्णी या कोथरूड परिसरात राहतात. राज्य तसेच केंद्रामध्ये कोथरूडचे ‘ वजन ‘ वाढलेले असताना महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेचे काम या भागात रखडलेले असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील अनेक भागात पुरेसे पाणी मिळत नाही, काही ठिकाणी पाणी येते तर काही ठिकाणी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होतो, अशा तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहे. या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठ्याचा आढावा पाटील यांनी घेतला.या बैठकीला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता श्रीकांत वायदंडे, प्रसन्नराघव जोशी, कार्यकारी अभियंता विनोद क्षीरसागर, उपअभियंता प्रशांत कदम, कनिष्ठ अभियंता गणेश काकडे आदी उपस्थित होते.
पुणे शहरात समान पाणीपुरवठा प्रकल्प अंतर्गत १४१ झोन निश्चित केले आहेत. त्यामधील १७ झोन हे कोथरूड विधानसभा मतदारसंघात आहेत. सध्या असलेली पाणी वितरण व्यवस्था आणि आवश्यक त्या ठिकाणी नवीन जलवाहिन्या टाकून नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांना दिली.कोथरूड मतदारसंघातील नवीन पाण्याच्या टाक्यांपैकी १६ टाक्यांचे काम पूर्ण झाले आहे. आयडियल कॉलनी टाकीच्या जागेबाबत विधी महाविद्यालय, पुणे महानगरपालिका यांच्यामध्ये जागेबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे टाकीचे काम अपूर्ण असल्याची बाब मंत्री पाटील यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. यावर आयडियल कॉलनीच्या टाकीचा प्रश्न सामोपचाराने सर्वांना विश्वासात घेऊन मार्गी लावावा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.
मुळशी धरणातून पाण्याचा प्रस्ताव
पुणे शहराची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांची गरज वाढली आहे. पाण्याची वाढती मागणी पाहता, खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होणे शक्य नाही. त्यामुळे पुणेकरांसाठी मुळशी धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. पुढील काही दिवसांमंध्ये यावर निर्णय घेतला जाईल, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.