औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली. यासह रायगडावरची शिवछत्रपतींची समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. लोकमान्य टिळकांना तुम्ही आता ब्राम्हण म्हणून बघणार आहात का?, असा सवालही केला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून आता राजकारण तापले आहे. राज ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर महाविकास आघाडीमधील मंत्र्यांसह, संभाजी ब्रिगेडने या विधानावरुन जोरदार टीका केली आहे. याबाबत आता श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने लोकमान्य टिळक यांच्या पुढाकारामधूनच, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम पूर्ण झाल्याचे म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे काम लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने झाले आहे. त्यावर कोणीही राजकारण करू नये,अशी भूमिका श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळमार्फत आयोजित पत्रकार परिषदेत मांडण्यात आली आहे. या पत्रकार परिषदेला श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजी राजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे, माजी अध्यक्ष जगदीश कदम आणि लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक उपस्थित होते.

“लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने १८९५ साली श्री. शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना झाली. त्या माध्यमांतून अनेक कामे करण्यात आली. त्याच दरम्यान रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची मेघडंबरीसह समाधी बांधली जावी,अशी कल्पना त्यांच्या मनामध्ये आली. त्यानुसार या कामासाठी लागणारा निधी प्रत्येकाकडून गोळा करण्यात आला आणि या कामाला यश देखील आले. समाधी स्थळ उभारण्यासाठी जवळपास २७ हजार रुपये लोकवर्गणीतून उभे राहिले. हे सर्व पैसे त्यांनी एका बॅंकेत ठेवले. पण ती काही महिन्यामध्ये दिवाळखोरीत निघाली आणि पैसे बुडाले. मात्र त्यानंतरही लोकमान्य टिळक यांनी हार न मानता,पुन्हा लोकवर्गणीतून पैसे उभारले. पण त्याच दरम्यान लोकमान्य टिळक यांचे निधन झाले. छत्रपतींच्या समाधीसाठी १९२५ साली कामाला सुरुवात करण्यात आली आणि वर्षभरात काम पूर्ण देखील झाले,” असे सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे म्हणाले.

“एका गोष्टीची कायम खंत आहे की, लोकमान्य टिळक यांच्या हयातीत काम पूर्ण झाले पाहिजे होते. पण ते झाले नाही. मात्र लोकमान्य टिळक यांच्या पुढाकाराने आणि प्रेरणेतून हे काम झाले आहे. तसेच लोकमान्य टिळक यांच्याबद्दल काही विधाने दोन दिवसापासून करण्यात येत आहेत. याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करीत असून यावर कोणीही राजकारण करू नये,” असेही पांडुरंग बलकवडे म्हणाले.  

लोकमान्य टिळकांवरुन घाणेरडे राजकारण सुरु – कुणाल टिळक

“लोकमान्य टिळक यांच्या कार्याबद्दल सोशल मीडियावर जी काही चर्चा सुरू आहे त्यावर मी माझी भूमिका दोन दिवसापासून मांडत आहे. राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथील सभेत लोकमान्य टिळक यांच्या बद्दल जी भूमिका मांडली मी त्याला विरोध किंवा निषेध देखील करत नाही. पण त्याच दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि अन्य काही इतिहासकार म्हणतात की,लोकमान्य टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकरता एक वीट देखील हलवली नाही. त्यावर माझा आक्षेप आहे. लोकमान्य टिळक यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळाकरता फार मोठे योगदान आहे. ते आपण विसरता कामा नये. ते नाकारने म्हणजे लोकमान्य टिळकांच्या कार्याचा अपमान आहे,” अशी भूमिका लोकमान्य टिळक यांचे वंशज कुणाल टिळक यांनी मांडली. तसेच लोकमान्य टिळक यांच्यावरून जे राजकारण सुरू आहे ते खूप घाणेरड्या प्रकारे सुरू आहे आणि कृपया हे थांबवले पाहिजे, असेही कुणाल टिळक म्हणाले.