पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाचे काम येत्या १ मे पासून पूर्ण क्षमतेने चालू होणार असल्याची माहिती प्राधिकरणाचे अध्यक्ष, पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिली. आकुर्डी येथील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात प्राधिकरणाचे कार्यालय सुरू होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुणे आणि परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी राज्य शासनाने पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाची (पुणे मेट्रोपोलिटिन रिजन डेव्हलपमेंट अॅथॉरिटी- पीएमआरडीए) स्थापना केली असून या प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी गिरीश बापट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पीएमआरडीएचे कार्यालय आकुर्डी येथे सुरू करण्याबाबतही शासनाने निर्देश दिले आहेत. प्राधिकरणाची स्थापना, अध्यक्षांची नियुक्ती तसेच प्राधिकरणाचे कार्यालय या संबंधीच्या सर्व बाबींची पूर्तता राज्य शासनाकडून गेल्या महिन्यातच झाल्यामुळे आता हे काम मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू झाली आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष बापट यांनी प्राधिकरण स्थापनेपासून ते आतापर्यंत काय काम झाले आणि काय काय कार्यवाही झाली याचा आढावा शनिवारी एका बैठकीत घेतला.
प्राधिकरणाचे कामकाज आता पूर्ण क्षमतेने करण्यासाठी कार्यालयाचे नियोजन करण्यात आले असून त्यासाठीची आवश्यक तयारी प्रगतिपथावर आहे. प्राधिकरणाचे कार्यालय १ मे पासून सुरू केल्यानंतर प्राधिकरणाची पहिली सभा मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ात आयोजित करण्यात येणार आहे. मुख्य अधिकारी सुधाकर नागनुरे यांना तशा सूचना देण्यात आल्या असल्याचे बापट यांनी सांगितले. जिल्हाधिकारी क्षेत्रातील प्रलंबित विकास आणि बांधकाम परवानगी प्रकरणी नगर रचना सहसंचालक आणि मुख्य अधिकारी यांना लवकर कार्यवाही सुरू करावी अशा सूचना देण्यात आल्या असल्याची माहितीही बापट यांनी दिली. प्राधिकरणाचे नवे कार्यालय कार्यान्वित होईपर्यंत ही कार्यवाही नगर रचना सहसंचालक कार्यालयातून नवीन प्रशासकीय इमारत विधान भवन पूर्व बाजू, तिसरा मजला येथून केली जाईल.
पुणे परिसराच्या तीन हजार चौरस किलोमीटर परिसरात नियोजनबद्ध विकासाची प्रक्रिया सुरू करण्याचा मार्ग पीएमआरडीएच्या स्थापनेमुळे मोकळा झाला आहे. पुण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना झालेली असल्यामुळे प्रामुख्याने वाहतूक, बांधकाम नियंत्रण आणि पुणे परिसराचा विकास आराखडा हे विषय प्राधिकरणाला मार्गी लावावे लागतील आणि प्राधिकरणाला असलेले अधिकार पाहता विकासाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजना प्राधिकरण राबवू शकेल. पुणे परिसरासाठी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे काम प्राधिकरणाला करावे लागणार आहे. तसे नियोजन प्राधिकरणामार्फत केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा