पिंपरीतील एचए कंपनीतील कामगारांची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली असून वेळीच निर्णय होत नसल्याने कामगारांचे भवितव्य अंधकारमय असल्याचे चित्र पुढे आले आहे. गेल्या पाच महिन्यांपासून कामगारांना पगार नाही, यांसारख्या अनेक अडचणी आहेत. याबाबतची माहिती घेण्यासाठी एचए कामगार संघटनेच्या अध्यक्षा व खासदार सुप्रिया सुळे सोमवारी िपपरीत येत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून एचए कामगारांना अनेक अडचणीतून जावे लागत आहे. कामगारांना पाच महिन्यांपासून पगार नाही, उत्पादन प्रक्रिया थांबली आहे. पुनर्वसन योजना प्रलंबित आहे, त्यास मान्यता मिळण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. ‘बीआयएफआर’ ने कंपनीच्या मालकीची सहा एकर जागा विकण्यास सांगितले, त्यानुसार, निविदा काढण्यात आल्या. म्हाडाने ११८ कोटींची निविदा भरली. मात्र, यासंदर्भात, निर्णय झाला नाही. केंद्रीय रसायन राज्यमंत्री श्रीकांत जीना यांनी निर्णय घेण्यास दिरंगाई चालवल्याचा आरोप कामगार संघटनेकडून होत आहे. योग्य वेळी हा निर्णय झाला असता तर अनेक प्रश्न मार्गी लागले असते, आजची परिस्थिती उद्भवली नसती. मात्र निर्णय का होत नाहीत, याविषयी कामगारांमध्ये संभ्रमावस्था आहे. खासदार सुळे गेल्या तीन वर्षांपासून एचए कामगार संघटनेच्या अध्यक्षा आहेत. कामगारांच्या प्रश्नांसाठी त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह जीना यांच्यासमवेत बैठका, मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा, कंपनी व्यवस्थापनाशी सातत्याने संवाद करूनही हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. यासंदर्भात, सुळे सोमवारी कंपनीत येत असून प्रवेशद्वारावर त्यांची सभा होणार असल्याचे कंपनीचे सरचिटणीस सुनील पाटसकर यांनी कळवले आहे.

Story img Loader