पुणे : माथाडी कायद्याची राज्यभरात काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, तसेच बाजार समितीचे केंद्रीकरण करणारे २०१८ चे विधेयक (राष्ट्रीय दर्जा बाजार समिती बनविणे) मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी कामगार संघटनांनी राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील कामगार संघटना बंदमध्ये सहभागी होणार असल्याने सोमवारी मार्केट यार्डातील कामकाज बंद ठेवण्यात येणार आहे.
श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे यांनी बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांना निवेदन दिले. मार्केट यार्डातील कामकाजात कामगार संघटना सहभागी होणार असल्याने सोमवारी (२६ फेब्रुवारी) शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीस पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईतील आझाद मैदान येथे राज्यातील सर्व कामगार संघटनांकडून उपोषण करण्यात येणार आहे. माथाडी कायदा मोडीत काढण्यासाठी माथाडी विधेयक मांडण्यात आलेले आहे. संबंधित विधेयक मागे घेण्यात यावे. माथाडी मंडळात कामगारांच्या मुलांना प्राधान्याने नोकरी द्यावी, तसेच लोकशाही पद्धतीने व्यवस्थित बाजार समित्या सुरू आहेत. त्यांचे केंद्रीकरण करण्याची गरज नसल्याचे कामगार संघटनांकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.