पुणे : भारतीय जनता पक्षाच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त शहर कार्यालयात आयोजित स्नेहमेळाव्यास सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून भाजप पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. दरम्यान, वर्धापन दिनानिमित्त नऊ हजार सक्रिय कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे काम पूर्ण केले जाईल, असे शहराध्यक्ष घाटे यांनी जाहीर केले.

म्हात्रे पुलाजवळ डीपी रस्त्यावरील शहर कार्यालयात सकाळी आठ ते अकरा या कालावधीत हा मेळावा झाला. ध्वजवंदन आणि श्री राम नवमीनिमित्त श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. केंद्रीय सहकार आणि नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी, माजी खासदार प्रकाश जावडेकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, माधव भंडारी यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि आमदार या वेळी उपस्थित होते. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी, काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही भाजप कार्यालयात उपस्थित राहून पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

शहरात भाजपने साडेपाच लाख प्राथमिक सदस्यांची नोंदणी पूर्ण केली आहे. नऊ हजार सक्रिय कार्यकर्त्यांची नोंदणी करण्याचे लक्ष्य नजीकच्या काळात पूर्ण केले जाणार आहे. वर्धापन दिनानिमित्त शहरातील एक हजार जुन्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांचा किंवा कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला, असे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सांगितले.

दरम्यान, शहरातील बुथ स्तरावरील नियुक्त्या पूर्ण केल्या जाणार आहेत. भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्या घरावर पक्षाचा झेंडा फडकवणार आहेत. सर्व कुटुंबीयांसह सेल्फी काढण्यात येणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनापर्यंत विविध प्रकारचे सेवा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. त्यामध्ये प्रत्येक कार्यकर्ता किमान आठ तास गाव आणि वस्तीमध्ये प्रवास करणार आहे. तसेच, स्वच्छता कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. विविध योजनांमधील किमान दहा लाभार्थ्यांचा प्रत्येक कार्यकर्त्याद्वारे संपर्क साधला जाणार आहे, असेही घाटे यांनी सांगितले.