निवडणूक प्रचाराच्या पदयात्रेत चांगली गर्दी दिसून प्रभाव पाडण्यासाठी उमेदवारांकडून मजूर कट्टय़ावरील मजुरांचा वापर केला जात आहे. रविवारी सुटीच्या दिवशी या मजुरांना प्रचारासाठी चांगलीच मागणी आली होती. पिंपरी- चिंचवडमध्ये अनेक उमेदवारांनी पदयात्रा काढून रविवारी प्रचार केला. मजुरांना दोनशे रुपयांपासून सातशे रुपयांपर्यंतची रक्कम उमेदवारांकडून मिळत असल्याने मजुरी सोडून अनेक मजूर पदयात्रांच्या रोजंदारीत दाखल झाले आहेत.
महापालिका निवडणूक अवघ्या नऊ दिवसावर आल्याने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. पदयात्र, कोपरा सभेने शहर ढवळून निघत आहे. पदयात्रा किंवा सभेला लोकांची गर्दी दिसावी यासाठी उमेदवारांकडून मजुरांचा वापर केला जात आहे. गर्दी कमी दिसली तर उमेदवाराचा प्रभाव कमी आहे असे वाटू नये यासाठी प्रत्येक उमेदवाराकडून गर्दीसाठी मजूर रोजंदारीवर लावला जातो आहे. काळेवाडी येथे रहाटणी फाटा, कृष्णानगर भाजी मंडई चौक, भोसरी नाटय़गृह, चिंचवड, वाल्हेकरवाडी आणि पिंपरी येथे रोज सकाळी अनेक मजूर एका ठिकाणी थांबतात. या मजूर कट्टय़ावर येऊन पैशांची बोलणी करून मजूर प्रचारासाठी नेले जातात. शहरात मंदीचा काळ सुरु असल्याने मजूरांना कमी काम मिळते. मात्र, निवडणुका लागल्यापासून पत्रके वाटपाच्या कामापासून ते पदयात्रांमुळे मजुरांच्या हाताला भरपूर काम मिळत आहे.
उमेदवारांना प्रचार करण्यासाठी कमी कालावधी असल्यामुळे पदयात्रा, कोपरा सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न प्रत्येक उमेदवार करीत आहे. यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळासाठी उमेदवारांना मजूर कट्टय़ावर जावे लागते. मागणी जास्त असल्याने मजुरांनी उमेदवारांकडून विविध पध्दतीने मेहनतना घेतला जात आहे. उमेदवारांना प्रचारासाठी माणसांची कमतरता पडत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोक मिळावीत यासाठी उमेदवारांना मजुरांच्या नाकदुऱ्या काढाव्या लागत आहेत.