लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : भोसरीतील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या महिला आणि पुरुष कामगारांना पुढील उच्च शिक्षण घेण्याची संधी निर्माण होणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आणि फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन या संस्थांमध्ये कामगारांना रात्रपाळी मध्ये पदवीचे शिक्षण देण्याबाबतचा करार करण्यात आला आहे.
डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य रणजीत पाटील यांनी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांना कराराची प्रत दिली. कामगारांना तीन पाळ्यांमध्ये काम असल्याने उच्च शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाअभावी पदोन्नती मिळत नाही. कंपन्यांमध्ये अत्याधुनिक मशिनरी आल्या आहेत. वाढते तंत्रज्ञान पाहता शिक्षित कामगार असणे आवश्यक झाले आहे. कामगारांची पुढील शिक्षण घेण्याची तयारी असते. परंतु काम करून महाविद्यालयात जाऊ शकत नसल्याने अनेक कामगार उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. त्यासाठी भोर यांनी पुढाकार घेतला.
आणखी वाचा-पिंपरी महापालिका करणार बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी आठ कोटी खर्च
कामगारांच्या शिक्षणासाठी डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालयासोबत करार करण्यात आला. कंपनीमध्येच कामगारांना पुढील शिक्षण घेण्यासाठी व्यवस्था केली जाणार आहे. महाविद्यालयाचे प्रतिनिधी रात्री कंपनीत येवून कामगारांना शिक्षण देणार आहेत. त्यासाठीचे प्रवेश शुल्क अल्प ठेवण्यात येणार आहे.
या उपक्रमामुळे कामगारांना पुढील शिक्षण घेता येणार आहे. कामगार शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत. कंपन्या सामाजिक दायित्व निधी (सीएसआर) कामगारांच्या शिक्षणासाठी वापरु शकतात. -अभय भोर, अध्यक्ष, इंडस्ट्रीज असोसिएशन