पुणे प्रतिनिधी: मागील काही महिन्यापासून पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कोणत्या ना कोणत्या कारणास्तव चर्चेत राहिले आहे.तर काल सायंकाळच्या सुमारास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांमार्फत रामायणामधील घटनेवर आधारित ‘जब वी मेट’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता.मात्र या नाटकातील संवादावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत,या नाटकाचा प्रयोग उधळून लावला.या नाटकाच्या विरोधात अभविपकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली होती.
या घटनेच्या प्रकरणी नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली.तर या सर्व घडामोडी दरम्यान भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राची तोडफोड करित निषेध नोंदविला.तर या प्रकरणी पोलिसांनी तोडफोड करणार्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून अधिक चौकशी सुरू आहे.